ईएसआयसी रुग्णालयावर अतिरिक्त भार 

दीपेश सुराणा
गुरुवार, 21 जून 2018

पिंपरी - मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयावर सध्या रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 6 लाख कामगार या रुग्णालयावर अवलंबून आहेत. तुलनेत रुग्णालयामध्ये फक्त शंभर खाटांची सोय आहे. त्यामुळे कामगारांना महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची वेळ येत आहे. सरकारी अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने कामगारांची तब्बल 1 कोटी 38 लाख रुपयांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले थकीत आहेत. 

मोहननगरच्या ईएसआय रुग्णालयात पिंपरी-चिंचवड, देहू, लोणावळा, चाकण, राजगुरुनगर, आळंदी या पट्ट्यातील कामगार उपचारासाठी येतात. दरमहा 21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या शहर व लगतच्या परिसरातील सुमारे 6 लाख कामगारांच्या उपचारासाठी मोहननगरचे ईएसआय रुग्णालय आहे. शासकीय निकषानुसार दर एक हजार कामगारामागे 3 खाटा अशी सोय असणे आवश्‍यक आहे. त्यानुसार 6 लाख कामगारांसाठी 1200 खाटांचे रुग्णालय असायला हवे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ 100 खाटांचे रुग्णालय सुरू आहे. 

कामगारांना बिलांची प्रतीक्षा 
रुग्णालयात खाटांची अपुरी सोय असल्याने महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये कामगार उपचारासाठी जातात. कामगारांनी खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या उपचाराच्या खर्चाची 1 कोटी 38 लाख रुपयांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम अद्याप राज्य सरकारकडून मिळालेली नाही. त्यामुळे रुग्णालयाकडूनदेखील कामगारांना ही रक्‍कम देणे बाकी आहे. 

दृष्टिक्षेपात रुग्णालय 
* खाटा : 100 
* बाह्यरुग्ण विभाग तपासणी (दररोज) : 250 ते 300 रुग्ण 
* पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रुग्णांसाठी जेवणाची सोय उपलब्ध 
* कान, नाक, घसा, त्वचा, बालरोग, उरो रोग, स्त्रीरोग विभाग सुरू 
* नेत्ररोग, दंतरोग, रेडिओलॉजिस्ट, तसेच तज्ज्ञ डॉक्‍टरांचा अभाव 
* रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकदेखील प्रभारी 

"रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या 13 मंजूर पदांपैकी 11 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 6 पदांवर अंशकालीन स्पेशालिस्ट डॉक्‍टर भरलेले आहेत. कामगारांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या थकीत असलेल्या बिलाबाबत राज्य सरकारकडे मागणी केली आहे.'' 
- आर. जे. कुंभारे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय 

"रुग्णालयात मी सोमवारपासून उपचारासाठी दाखल झालो. वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहेत. स्वच्छतागृहाची मात्र चांगली स्वच्छता होणे गरजेचे आहे.'' 
- राकेश मेस्त्री, रुग्ण 

Web Title: Additional load on the ESIC hospital