LokSabha 2019 : मतमोजणीची तयारी जोरात; उमेदवारांची धाकधूक वाढली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.

एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे. 

पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरवात होईल. "सर्व्हिस वोटर'साठी ऑनलाइन ईटीपीबीएसद्वारे आणि पोस्टल मतदान झालेल्या मतपत्रिकांच्या मोजणीला सुरवात करण्यात येईल, त्याचवेळी ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीला सुरवात होईल. 

मुंबई येथे गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच नाशिक विभागातील नगर आणि शिर्डी जिल्ह्यांतील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी या वेळी उपस्थित होते. व्हीव्हीपॅट मशिनमधील स्लिपची मोजणी, सर्व्हिस वोटर, पोस्टल मतदान आणि मतमोजणीच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

मतमोजणी केंद्रात लागणारे साहित्य आणि आवश्‍यक तयारीबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 21 मे रोजी "सुविधा' ऍपवर मतमोजणीची माहिती संकलित करण्याबाबत आयटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मतमोजणीची रंगीत तालीम होईल. 
- मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration All set for Counting day for Lok Sabha 2019 elections