....म्हणून बारामतीत प्रशासनाकडून बेड, चाचण्यांची संख्या वाढविण्यावर दिला जातोय भर

मिलिंद संगई
Sunday, 30 August 2020

कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बेडसची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. बारामतीमध्ये लक्षणे असलेल्या, लक्षणे नसलेल्या व गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.

बारामती (पुणे) : शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बेडसची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. बारामतीमध्ये लक्षणे असलेल्या, लक्षणे नसलेल्या व गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. काल एकाच दिवसात 275 स्वॅब तपासले गेले. ही संख्या दैनंदिन 300 पर्यंत न्यायचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे. 

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. येथे 164 खोल्या असून सध्या येथे 118 रुग्ण उपचार घेत आहेत. रुई ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनच्या सुविधेचे 30 बेड असून अतिदक्षता विभागाचे सहा बेडस आहेत. येथे सध्या 29 रुग्ण उपचार घेत आहेत. बारामती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सुविधेचे 12 तर अतिदक्षता विभागाचे 8 बेडस आहेत. येथेही अतिदक्षता विभागात सध्या जागा नाही.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

दुसरीकडे शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील ऑक्सिजनची सुविधा येत्या आठवडाभरात कार्यान्वित होणार आहे. येथे 86 बेडसला ऑक्सिजन सुविधा कोरोना रुग्णासाठी असेल, या पैकी 20 बेडस अतिदक्षता विभागात असतील. खासगी दवाखान्यात 12 अतिदक्षता विभागाचे बेडस उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन सुविधा असलेले 114 बेड उपलब्ध आहेत.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान माळेगाव येथेही आता कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या पण लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 168 बेडसची व्यवस्था करण्यात आली असून गरज पडल्यास तेथेही रुग्णांना दाखल केले जाईल, येथे आणखी 250 रुग्णांची व्यवस्था अतिरिक्त होऊ शकते,  असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

 

1 सप्टेंबरपासून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात बारामती शहरातील रुग्णांच्या रॅपिड अँटीजेन तपासण्या होणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांच्या सकाळी साडेआठ ते दुपारी एकपर्यंत स्वॅब घेतले जातील.

- डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सि. ज्यु. रुग्णालय. 

 

बारामतीतील उपलब्ध व्यवस्था
•    कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीचे बेड- 434
•    ऑक्सिजन सुविधा असलेले बेड- 122
•    व्हेंटीलेटर्ससह अतिदक्षता विभागातील बेड- 46


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration in Baramati emphasizes on increasing the number of beds and tests