इशाऱ्यानंतरही प्रशासन ढिम्म

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

अंदाज वर्तविणे हवामान खात्याचे काम आहे, तर त्याची गांभीर्याने दखल घेऊन खबरदारीचे उपाययोजना करणे, ही प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी. बुधवारी झालेल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

पुणे - अंदाज वर्तविणे हवामान खात्याचे काम आहे, तर त्याची गांभीर्याने दखल घेऊन खबरदारीचे उपाययोजना करणे, ही प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी. बुधवारी झालेल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षालाही त्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतरदेखील प्रशासकीय यंत्रणांनी कोणतीही पावले का उचलली नाहीत, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे.

पुण्यात अतिवृष्टीमुळे १३ जणांचे प्राण जातात. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याला नव्हता का, पूर्वसूचना देणारी यंत्रणा हवामान खात्याकडे का नाही, यासह विविध प्रश्‍न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित होते आहेत. त्यावर ‘बुधवारच्या पावसाचा अंदाज दिला होता,’ अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याचे अंदाज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात. तसेच ते सरकारी यंत्रणांपर्यंतही पोचविले जातात. या अंदाजाचा गांभीर्याने विचार करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे, हेदेखील प्रशासनाचे काम आहे. शहरात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्याची दखलही प्रशासनाने घेतली नसल्याचे या खात्याचे म्हणणे आहे. हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीच्या इशाऱ्याबाबतची माहिती राज्य सरकारकडे जाते. तेथून याबाबत संबंधित जिल्ह्याच्या आपत्कालीन कक्षाला कळविले जाते. या पद्धतीने बुधवारी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा मिळाला होता, अशी माहिती आपत्कालीन कक्षातून देण्यात आली.

खात्याने तीन दिवस संध्याकाळनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सलग तीन दिवस शहरात संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला.
- डॉ. अनुपम काश्‍यपी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration delayed even after warning