esakal | रस्तेविकासासाठी ‘पीपीपी’ तत्त्वाचा अवलंब; महापालिकेचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

Road Development

रस्तेविकासासाठी ‘पीपीपी’ तत्त्वाचा अवलंब; महापालिकेचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - विकास आराखड्यातील रस्ते वेगाने विकसित न झाल्यास त्याचा फटका शहराच्या दूरगामी नियोजनास बसतो. तो टाळण्यासाठी काही महत्त्वाचे रस्ते पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्याचा निर्धार पुणे महापालिकेने केला आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत हडपसर परिसरातील मगरपट्टा, अमनोरा पार्क, माळवाडी येथील तीन रस्त्यांसह खराडीतील आठ असे ११ रस्ते पीपीपी तत्त्वावर विकसित करणार आहेत. नगर रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन ते खराडी असा अभिनव उन्नत मार्गही याअंतर्गत उभारणार आहे.

महापालिकेने यापूर्वी बाणेर-बालेवाडीतील बालेवाडी हाय स्ट्रीटसह मुंढवा-खराडी भागातील तीन रस्ते पीपीपी तत्त्वावर विकसित केले आहेत. शहरांतर्गत वाहतुकीचा सरासरी वेग वाढविण्याच्या हेतूने महापालिकेतर्फे विकास आराखड्यात अनेक प्रशस्त रस्ते (डीपी रस्ते) प्रस्तावित आहेत. या रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागा आणि उपलब्ध निधीनुसार दरवर्षी टप्प्याटप्याने ते विकसित केले जातात. मात्र रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध असलेला निधी आणि जागा ताब्यात देण्यासाठी जागामालकांची रोख मोबदल्यांची मागणी लक्षात घेता विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्याच्या कामाला मर्यादा येतात. याशिवाय, वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विकासकामांवर काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागाने करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असून, त्याद्वारे २०२१-२२ मध्ये ११ रस्ते व दोन पुलांची कामे महापालिकेने प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: शिरुरमधील हॉटेलमध्ये वेटरनेच वेटरचा गळा चिरून केली निर्दयीपणे हत्या

बालेवाडी हाय-स्ट्रीट या पीपीपी तत्त्वावर यशस्वीपणे बांधण्यात आलेल्या रस्त्यानंतर क्रेडिट नोट पद्धतीने नवे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. यासाठी महापालिकेला थेट गुंतवणुकीची गरज नाही. शिवाय करारानुसार ठरावीक काळासाठी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारीही संबंधित खासगी विकसकास घ्यावी लागते. पीपीपीअंतर्गत रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी एफएसआय व टीडीआरच्या रूपाने मोबदला देण्यात येईल आणि रस्ते विकसनाचा खर्च संबंधित विकसकास क्रेडिट नोट स्वरूपात देण्यात येईल. संबंधित क्रेडिट नोट महापालिकेकडे देय असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काअंतर्गत वापरता येईल. अशा क्रेडिट नोट हस्तांतरीय देखील आहेत.

प्रस्तावित ११ रस्ते व दोन पुलांसाठी ५८१ कोटी खर्च अपेक्षित असून, बांधकाम परवानगी शुल्कात घट होऊ नये, यासाठी दरवर्षी केवळ २०० कोटी रुपयांच्याच क्रेडिट नोट खर्ची टाकण्याची मर्यादा घातली आहे. पीपीपीअंतर्गत १७३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांमध्ये हडपसर परिसरातील मगरपट्टा, अमनोरा पार्क व माळवाडी येथील तीन रस्त्यांसह खराडी परिसरातील आठ रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व रस्ते १८, २४ व ३० मीटर रुंदीचे असणार आहेत. हडपसर परिसरातील रस्त्यांमध्ये एका अंडरपासचाही समावेश आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात रुग्णांच्या संख्येत घट; 351 जणांचा मृत्यू

नगर रस्त्यास पर्यायी उन्नत मार्ग होणार

नगर रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन ते खराडी दरम्यान पीपीपी मॉडेलवर ३० मीटर रुंदीचा उन्नत मार्ग विकसित करणार आहे. बंडगार्डन ते कल्याणीनगर येथील आगाखान पूल व त्यापुढे वेस्टिन हॉटेल ते खराडीपर्यंत मुळा-मुठा नदीपात्राच्या उजव्या बाजूने साडेपाच किलोमीटरचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. यामार्गावर दोन पुलांचेही नियोजन आहे. तब्बल ४०८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम दोन ते तीन वर्षांत पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

रस्तेविकास हा सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे. वेळेत आणि नियोजनबद्ध झालेला रस्तेविकास शहरातील दळणवळण गतिमान तर करतोच, शिवाय महापालिकेच्या उत्पन्नावरील ताणही कमी करतो. याचाच विचार करून शहरातील महत्त्वपूर्ण रस्ते पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका