esakal | ॲड. दीप्ती काळेच्या साथीदाराला अटक; न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

बोलून बातमी शोधा

ॲड. दीप्ती काळेच्या साथीदाराला अटक; न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
ॲड. दीप्ती काळेच्या साथीदाराला अटक; न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
sakal_logo
By
सनिल गाडेकर

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेत आणखी ५८ गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच हाताने मारहाण केल्याच्या गुन्ह्यांत ॲड. दीप्ती काळेच्या साथीदारास फरासखाना पोलिसांनी अटक केली.

नितीन मनोहर हनमे (वय ३१, रा. संतोष नगर, कात्रज ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ॲड. दीप्ती काळे (वय ४५, बावधन), नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यातील आरोपी ॲड. दीप्ती काळे हिचा मंगळवारी (ता. २७) ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. फरार असलेले इतर दोन आरोपींचा शोध घेणे, या गुन्ह्यांत आरोपींनी रिव्हॉल्वर वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास करून ते जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपी हनमे याला काही रक्कम मिळाली आहे का?, कोयाळी, मरकळ येथील जमीन व्यवहार कशाप्रकारे झाला आदी तपास करण्यासाठी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण :

ॲड. काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. त्यानंतर तिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात खेड येथील तीन कोटी रुपयांची ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल, अशी धमकी दिली. यानंतर नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून ५८ गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या नव-‍याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेश तटकरे तपास करीत आहेत.