जाहिरातीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमीच

जाहिरातीचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमीच

पुणे - पीएमपीच्या बीआरटी मार्गावरील स्थानकांवरच्या जाहिरातींतून प्रशासनाने दोन महिन्यांत ३४ लाख रुपये कमावले आहेत. पीएमपीने दोन महिन्यांपूर्वी बीआरटीच्या थांब्यांवरील जाहिरातीचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. मात्र, मिळणारे उत्पन्न हे अपेक्षित उत्पन्नापेक्षा चार लाखांनी कमी असल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे.

पीएमपीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील बीआरटी मार्गावरील बसथांब्यांवरील जाहिरातीचे काम यावर्षी एप्रिलमध्ये एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यामध्ये दोन्ही शहरांतील बीआरटी बसथांब्यांवरील जाहिरातीचे हक्क या कंपनीला दिले आहेत. त्याबदल्यात कंपनीकडून पीएमपीला २१ लाख रुपये मासिक उत्पन्न मिळण्याची आपेक्षा होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रतिमहिना १७ लाख रुपयेच उत्पन्न मिळाले आहे. 

सर्व बसस्थानकांवर जाहिरातींचे काम पूर्ण झालेले नसल्याने कमी उत्पन्न मिळाल्याचे कंपनीकडून पीएमपी प्रशासनाला सांगण्यात आले आहे. 

बीआरटी बसथांब्यांवरून जाहिरातीच्या माध्यमातून पीएमपी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवीत असताना या स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये डिजिटल बोर्ड बंद पडलेला असणे, गाड्यांच्या वेळापत्रकातील गडबड, थांब्यावर प्रवाशांना अपुरी जागा, अशा काही तक्रारी आहेत.

बीआरटीच्या थांब्यांवरील जाहिरातीच्या माध्यमातून पीएमपीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हे काम खासगी कंपनीकडे दिले आहे. सध्या अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न मिळत असले, तरी पुढील काळामध्ये ते वाढणार आहे.
- सुभाष गायकवाड,  जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

चार लाखांचा फरक
 एकूण बीआरटी मार्ग ः ७२
 जाहिरातीची ठिकाणे ः ११०
 जाहिराती लावण्यात आलेली ठिकाणे ः ८५
 पीएमपीला मिळणारे मासिक उत्पन्न ः १७ लाख
 अपेक्षित मासिक उत्पन्न ः २१ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com