सल्लागाराच्या भरवशावर शिवसेनेचे राजकारण - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी हाणला. मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय मिळते, हेही ठाऊक नसेल; पण त्यांनी मोर्चा काढला, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी मोर्चाची खिल्ली उडविली.

पुणे - राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी हाणला. मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय मिळते, हेही ठाऊक नसेल; पण त्यांनी मोर्चा काढला, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी मोर्चाची खिल्ली उडविली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीनिमित्त पुण्यात आलेल्या पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होते. मात्र, त्याचा अहवाल दिला जात नाही. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तरुणांची फसवणूक केली आहे. या सरकारच्या योजना फसव्या आहेत. लोकांचा विचार न करता सरकार केवळ आपला अजेंडा रेटत आहे. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते देत आहेत. विधानसभा निवडणुकीत तसे होणार नाही. या सरकारबाबत लोकांच्या मनात चीड आहे.''

दरम्यान, पुण्यातून शहराध्यक्ष तुपे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली नसली, तरी त्यांना गरजेनुसार लढण्याचा आदेश दिला जाईल. मात्र ते पक्षात नाराज नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांतदादांचा आरोप खोटा
मावळमधून पार्थ पवार यांना पक्षातील सर्व नेत्यांच्या संमतीने उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे पार्थ यांना उमेदवारी दिली नसती तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण केले असते, हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप खोटा आहे, असे पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांना मोजायची सवय असल्याने ते आकड्यांत बोलतात, असा चिमटाही त्यांनी काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advisor Shivsena Politics Jayant Patil