तब्बल पावणेदोन कोटींची लाच घेताना वकिलाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे : भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयातील एका अपिलात
तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी एका वकिलाला पावणेदोन कोटी रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने अटक केली. बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे "एसीबी'चे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले.

ऍड. रोहित दत्तात्रेय शेंडे (वय 27, रा. सहकारनगर) असे अटक केलेल्या
संशयिताचे नाव आहे. पोलिस अधीक्षक दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार यांच्याकडे असलेल्या कुलमुखत्यारपत्रान्वये भूमी अभिलेखच्या
उपसंचालक कार्यालयात प्रलंबित अपिलाची सुनावणी सुरू होती. पर्वती येथील जमिनीच्या प्रकरणात सातबारावरील नावे कमी करण्याचे हे प्रकरण होते. तक्रारदाराच्या बाजूने उपसंचालक यांच्याकडून आदेश मिळवून देण्यासाठी आणि उपसंचालक यांना रक्‍कम देण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली. शेंडे याने तक्रारदार यांना उपसंचालकांच्या आदेशाची प्रतही दाखवली.

यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर शेंडे याने लाच मागितल्याचे समोर आले.
"एसीबी'च्या पथकाने बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास बंडगार्डन
परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि उर्वरित नोटांच्या आकाराचे कागद देण्यात आले. त्यानंतर शेंडे याला लाच घेताना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक दिवाण, पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या सूचनेनुसार पोलिस अधिकारी दिलीप बोरस्ते, प्रतिभा शेडगे, घार्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या अपील प्रकरणात भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी ऑर्डर दिली आहे. त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे का, हे तपासण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आजपर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
- संदीप दिवाण, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: advocate arrested for bribe of rupees 1.75 lakhs at Pune