नायलॉन मांजामुळे वकील जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुणे - आपल्या मुलासह दुचाकीवरून जाणाऱ्या वकिलाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. यामध्ये ते जखमी झाले; मात्र त्यात त्यांचा जीव थोडक्‍यात बचावला. ॲड. महेश गोगावले असे त्यांचे नाव असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. वडगाव शेरी परिसरात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 

पुणे - आपल्या मुलासह दुचाकीवरून जाणाऱ्या वकिलाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. यामध्ये ते जखमी झाले; मात्र त्यात त्यांचा जीव थोडक्‍यात बचावला. ॲड. महेश गोगावले असे त्यांचे नाव असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. वडगाव शेरी परिसरात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 

या वर्षात मांजामुळे दोन महिलांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतरही प्रशासन, पोलिस आणि महापालिकेच्या बेफिकिरीमुळे नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ॲड. गोगावले हे शनिवारी आपला मुलगा रुग्वेद (वय ८) याच्यासह दुचाकीवरून वडगाव शेरी येथील घरी जात होते. सोमनाथनगरजवळ रामचंद्र सभागृह येथे पोचताच नायलॉन मांजामध्ये अडकल्याने गोगावले यांच्या गळ्याला दुखापत झाली. गाडीवरून पडल्याने रुग्वेदलाही जखमा झाल्या. 

गोगावले यांच्या मानेतून रक्तस्राव होत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी लक्षात आणून देताच ते त्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. 

मांजामुळे वर्षभरात दोघींचा मृत्यू
फेब्रुवारी महिन्यात सुवर्णा मुजुमदार या तरुणीचा मांजामुळे गळा चिरल्याने मृत्यू झाला होता, तर ऑक्‍टोबर महिन्यात नाशिक फाटा परिसरात डॉ. कृपाली निकम या तरुणीचा मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाला होता. नायलॉन मांजाच्या वापरावर बंदीच्या आदेशानंतरही त्याचा वापर सर्रास सुरू आहे, त्यामुळेच अनेक व्यक्तींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. 

जिवावर बेतलेल्या अपघातातून सुदैवाने बचावलो. मात्र, अनेक जणांचे नायलॉन मांजामुळे प्राण गेले आहेत, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 
- ॲड. महेश गोगावले

Web Title: advocate injured due to nylon manja