‘मेट्रो’लगत परवडणारी घरे

- मंगेश कोळपकर
रविवार, 12 मार्च 2017

शिवाजीनगरला बहुमजली ‘हब’; जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावरून स्काय वॉक

शिवाजीनगरला बहुमजली ‘हब’; जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावरून स्काय वॉक

पुणे - शिवाजीनगरमध्ये धान्य गोदामाच्या जागेवर बहुमजली ‘मेट्रो हब’ साकारणार असून, तीन मार्गांची स्थानके एकाखाली एक अशा पद्धतीने तेथे उभी राहणार आहेत. तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मेट्रोचा वापर करता यावा, यासाठी जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता आणि गरवारे पुलाजवळून पादचाऱ्यांना थेट मेट्रोपर्यंत आणण्यासाठी ‘स्काय वॉक’ उभारण्याची संकल्पनाही महामेट्रो कंपनीने मांडली आहे. त्याचबरोबर शहरात नागपूरच्या ‘मिहान’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘मेट्रो सिटी’ उभारण्यात येणार असून, त्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होऊ शकतील. 

वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट, या दोन मेट्रो मार्गांच्या कामासाठीची प्रक्रिया पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी महामेट्रोने शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा दौरा आयोजित केला होता. त्यादरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी संवाद साधताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांची प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाचे वेळापत्रक, प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि प्रवासीकेंद्रित संकल्पनांची माहिती या वेळी दिली. या प्रसंगी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार अग्रवाल, वित्त संचालक शिव माथन आदी अधिकारी उपस्थित होते. मेट्रो सुरू करतानाच त्यात पीएमपीच्या बस, रिक्षा, सायकल आदी वाहतुकीचे घटकही सामावून घेण्यात येणार असून, ते परस्परांना पूरक ठरतील, अशा पद्धतीने सध्या नियोजन करण्यात येत आहे. बस-मेट्रोमधून एकाच कार्डद्वारे प्रवाशांना प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवासासाठी वारंवार तिकीट काढण्याची गरज नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

शिवाजीनगरमध्ये मेट्रो हब 
महामेट्रोतर्फे वनाज-रामवाडी, पिंपरी-स्वारगेट या मार्गांसाठी काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सुरू आहे. हे तिन्ही मार्ग शहरातून जाणार आहेत. शिवाजीनगरमध्ये धान्य गोदामाच्या जागेवर ते एकमेकांना छेदून जातील. त्या ठिकाणी ‘इंटरचेंज स्टेशन्स’ होतील. त्यामुळे प्रवाशांना तिन्ही मार्गांपैकी हव्या असलेल्या मार्गावर प्रवास करणे शक्‍य होणार आहे. या तीनपैकी दोन स्टेशन्स एलिव्हेटेड आणि एक भुयारी असेल. गोदामाच्या जागेवर सहा मजली इमारतीमध्ये ही स्टेशन्स असतील. वाहनतळ आणि पीएमपीच्या बसचाही त्यात समावेश असेल. लगतच सुमारे २० मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यातही मोठ्या आकाराचा वाहनतळ असेल. तसेच मेट्रोचे प्रशासकीय कार्यालय उभारण्यात येईल, या इमारतीमध्ये न्यायालयही साकारता येऊ शकेल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. 
 

स्काय वॉकची संकल्पना 
मेट्रो मार्गांना अधिकाधिक प्रवासी उपलब्ध व्हावेत, यासाठी शहराच्या मध्य भागात स्काय वॉक उभारण्याच्या प्रस्तावावर महामेट्रो सध्या विचार करीत आहे. त्यानुसार कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाजवळ, जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता येथे स्कायवॉक उभारण्यात येईल. ते परस्परांशी जोडले जातील. तसेच त्यांचा वापर करून शिवाजीनगर धान्य गोदामापर्यंत प्रवाशांना जाता येईल. त्यामुळे मध्य भागातील प्रवासी मेट्रोतून हव्या असलेल्या ठिकाणी प्रवास करू शकतील. मुठा नदीवरून केबलद्वारे स्कायवॉक उभारण्यात येईल. जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावर तसेच शहराच्या मध्य भागातील नागरिकांना स्कायवॉकद्वारे मेट्रोशी जोडण्यासाठी हा प्रस्ताव उपयुक्त ठरणार आहे. त्याबाबत नागरिकांनी लेखी स्वरूपात किंवा फेसबुकद्वारे महामेट्रोकडे सूचना पाठविल्यास त्यांचा अंतर्भाव करून अंतिम आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.
 

सर्व मार्गांचा एकात्मिक विचार 
शहराची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणारा हिंजवडी-शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग आम्ही महामेट्रोच्या मार्गांना जोडून घेत आहोत. या सर्व मार्गांचा एकात्मिकरितीनेच विचार करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.
 

मेट्रो सिटीत परवडणारी घरे 
नागपूरमध्ये मिहान येथे राज्य सरकारने मेट्रोच्या डेपोसाठी २४ एकर जागा दिली आहे. त्यातील ६ एकर जागेवर महामेट्रो डेपो उभारणार आहे. उर्वरित १८ एकर जागेवर मेट्रो सिटी उभारण्यात येणार आहे. त्यात मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात सुमारे ५०० घरे उभारण्यात येणार आहेत. प्रख्यात वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रक्‍टर त्याचा आराखडा तयार करीत आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच धर्तीवर पुण्यात कोथरूड, रेंजहिल्सजवळ किंवा कल्याणीनगर यापैकी जिथे भूखंड मिळेल तेथे मेट्रो सिटी उभारणार आहे. घरांबरोबरच उद्योग-व्यवसायही तेथे असू शकतील. त्यामुळे मेट्रोची प्रवासी संख्या वाढू शकते, असा विश्‍वास दीक्षित यांनी व्यक्त केला. 
 

असे असेल प्रत्यक्ष कामाचे वेळापत्रक

दोन्ही शहरांतील मेट्रो मार्गाच्या पहिल्या १० किलोमीटरचे प्रत्यक्ष काम एप्रिलच्या अखेरीस
पिंपरी-रेंजहिल्स मार्गाच्या निविदा प्रसिद्ध; ३१ मार्चपर्यंत निविदांची मुदत 
रेंजहिल्स-स्वारगेट मार्गाच्या निविदा तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणार 
वनाज-शिवाजीनगर धान्य गोदाम मेट्रो मार्गाच्या निविदा मार्च महिन्यापर्यंत प्रसिद्ध होतील 
शिवाजीनगर-रामवाडीच्या निविदा त्यानंतर चार महिन्यांत प्रसिद्ध होणार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: affordable homes near metro