आफ्रिका, आशिया खंडांची सहल (व्हि़डिओ)

नीला शर्मा
शनिवार, 18 मे 2019

आफ्रिका व आशिया खंडांमधील तब्बल ५८ देशांच्या संस्कृतीचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं ते आफ्रोएशियन सांस्कृतिक संग्रहालयात. दिजीबौटी, एरिट्रिया, कोट डी व्हॉयर वगैरे आपण सहसा न ऐकलेल्या नावाचे देश या ठिकाणी माहीत होतात. छायाचित्रं व वस्तूंच्या रूपानं या देशांशी आपली भेट घडते.

पुणे - आफ्रिका व आशिया खंडांमधील तब्बल ५८ देशांच्या संस्कृतीचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं ते आफ्रोएशियन सांस्कृतिक संग्रहालयात. दिजीबौटी, एरिट्रिया, कोट डी व्हॉयर वगैरे आपण सहसा न ऐकलेल्या नावाचे देश या ठिकाणी माहीत होतात. छायाचित्रं व वस्तूंच्या रूपानं या देशांशी आपली भेट घडते.

सिंबायोसिस संस्थेचं हे आगळंवेगळं संग्रहालय संस्थेच्या सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाजवळच आहे.

विश्‍वभवन अंतर्गत हे संग्रहालय म्हणजे या देशांच्या सांस्कृतिक माहितीचा कॅलिडोस्कोपच. येथे प्रवेश करताच समोर असलेल्या टचस्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला संग्रहालयातील माहितीपटलांचा धांडोळा घेता येतो.

समजा ‘युगांडा’ असं नाव लिहिलेल्या जागी बोट ठेवलं तर त्या देशाचं क्षेत्रफळ, लोकसंख्या, भाषा वगैरे माहिती पडद्यावर झळकते.

संग्रहालयात निरनिराळ्या देशांमधील खाद्यपदार्थ, पारंपरिक वेश, कलात्मक वस्तू, नृत्यासाठी वापरले जाणारे मुखवटे आदींचं दर्शन घडतं.

येथील प्रशासकीय अधिकारी अमित झगडे म्हणाले, ‘‘सिंबायोसिस संस्थेत आफ्रिका व आशिया खंडांतील विविध देशांमधील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. ते त्यांच्या देशातील वस्तू संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना भेट देतात. डॉ. मुजुमदार यांनी या वस्तूंचं संग्रहालय करून ते जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून देण्याची कल्पना सुचविली. त्याप्रमाणे हे संग्रहालय १९ वर्षांपूर्वी सुरू झालं.’’

बच्चे कंपनीला इथली एक गोष्ट फार आवडते, ती म्हणजे येथे समाविष्ट कोणत्याही देशाचं राष्ट्रगीत त्यांना इथं ऐकायला मिळतं. त्याचं इंग्रजीत केलेलं भाषांतर वाचत मुलं ते ऐकतात. त्या देशांच्या राष्ट्रध्वजांबद्दलची माहितीही मुलं उत्सुकतेनं विचारतात.

Web Title: Afro Asian Cultural Museum Summer Holiday Child Dhamal Sutichi