तीन पिढ्यांनंतर उजळले भाग्य...बारामतीतील 45 कुटुंबांना मिळाला हक्काचा रस्ता

संतोष शेंडकर
Wednesday, 15 July 2020

बारामती तालुक्यातील करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या लकडेवस्ती येथील 45 घरांना तब्बल 60 वर्षांनी हक्काचा रस्ता मिळाला आहे.

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या लकडेवस्ती येथील 45 घरांना तब्बल 60 वर्षांनी हक्काचा रस्ता मिळाला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातून रस्ता देऊ केला आणि ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या मदतीने त्वरीत रस्ता करून घेतला. यामुळे लकडेवस्ती ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय ग्रामपंचायतीलाही माळावर विकासकामे करता येणार आहेत. 

पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रुग्णवाढ

लकडेवस्ती येथील टेकडीवजा माळावर सन १९६० पासून मेंढपाळ व शेतकऱ्यांनी रहायला सुरवात केली. मेंढ्यांसाठी स्वच्छ हवा आणि खडकाळ जमीन उपयुक्त ठरत होती. कच्च्या घराची हळूहळू पक्की घरे झाली. काही शेतकऱ्यांनीही उंच जागा पसंत केली. मात्र, या ४५ घरांतील मागील तीन पिढ्यांना माळावर जायला हक्काचा रस्ता नव्हता. माळाशेजारील शेतकऱ्यांना विनंती करून धान्यादी मालाची वाहतूक करावी लागायची. दुचाकी जाईल अशा पायवाटेनेच बराचसा व्यवहार करावा लागत होता. रस्ता नसल्याने वस्तीवर विकासकामे करायलाही अडचणी येत होत्या. 

पुण्यात पीएमपी वाहतूक सुरू करण्याबाबत महत्त्वाचा आदेश

या अडचणी ओळखून सरपंच वैभव अशोक गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल रामदास गायकवाड, बाबूराव कोंडिबा गायकवाड, जगन्नाथ कृष्णा गायकवाड, रामदास कृष्णा गायकवाड, अशोक राजाराम गायकवाड, अशोक सोमनाथ गायकवाड या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीतून रस्ता देण्याची तयारी दर्शविली. यानंतर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी शेतकऱ्यांचा हा उत्साह पाहून स्वतःच्या फंडातून तेरा लाख रुपये रक्कम त्वरीत रस्त्यासाठी दिली. त्यामुळे डोंगर फोडून चारशे मीटरचा मुरूमाचा रस्ता तयार करणे शक्य झाले, अशी माहिती सरपंच वैभव गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आता बांधकाम साहित्याची, शेतमालाची, मेंढ्यांची वाहतूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. शिवाय रस्ता हक्काचा झाला आहे. यामुळे लकडेवस्ती ग्रामस्थांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे.
 

कोरोनाच्या लढ्यात पुण्यातील गणपती मंडळांचा सहभाग

वैभव गायकवाड म्हणाले, लकडेवस्तीवरील रहिवाशांना आम्ही शब्द दिला होता. त्यानुसार करंजेपूल ग्रामस्थांच्या आणि प्रमोद काकडे यांच्या सहकार्यातून रस्ता दिला आहे. आता वस्तीवर विकासाच्या योजनाही राबविता येणार आहेत. आठ लाखाची अंगणवाडीची नवीन इमारत आणि मंदिराच्या पाच लाखांच्या सभामंडपाचे कामही वस्तीवर सुरू झाले आहे. तसेच, वस्तीवरील रहिवाशी नवनाथ गायकवाड म्हणाले की, मागच्या तीन पिढ्यांची समस्या सुटली आणि आमच्या चौथ्या पिढीला हक्काचा रस्ता मिळाला. आम्ही खूप समाधानी आहोत.

Edited by : Nilesh Shende
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 60 years, 45 families in Baramati taluka got their rightful way