श्‍वानदंशानंतर टेंशन लशीचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

शहरात रेबीज प्रतिबंधक लशीची मागणी वाढत आहे. पण, त्या तुलनेत कंपन्यांकडून या लशीचा पुरवठा होत नाही. देशभरात या लशीची मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही एक हजार लशीची मागणी केल्यानंतर महिनाभरात जेमतेम 50 लशीचा पुरवठा होता. 
- चेतन शहा, घाऊक औषध विक्रेते 

पुणे : सकाळी सहा वाजता सिंहगड रस्त्यावरून सायकलिंग करत असताना मागून आलेल्या कुत्र्याने डाव्या पायाला चावा घेतला. तेव्हापासून रेबीज प्रतिबंधक लशीसाठी सुरू झालेली धावपळ पुढील आठ-नऊ तास सुरू होती. एका बाजूला लस मिळत नसल्याने क्षणाक्षणाला वाढणारे टेंशन आणि दुसरीकडे असह्य वेदना... असा आयुष्यातील एक अनुभव शनिवारी गाठीला बांधला. 

माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणारा सुशांत काळे सांगत होता... पुण्यासारख्या ठिकाणी रेबीज प्रतिबंधक लस मिळणे कठीण आहे, याचा अनुभव आज आला. डॉक्‍टरांकडे गेलो, त्यांच्याकडे लस नाही. खासगी रुग्णालयात गेलो, तेथे लशीचा खडखडाट. अखेर, एका डॉक्‍टरच्या मदतीने बड्या खासगी रुग्णालयात लस मिळाली. पण, तीन हजार रुपये त्यासाठी मोजावे लागले. त्यासाठी आठ ते नऊ तास अक्षरशः झगडत होतो, अशी माहिती त्याने "सकाळ'ला दिली. 
 

रेबीज प्रतिबंधक लशीचा तुटवडा 

शहरात श्‍वानदंशाच्या घटना वेगाने वाढत असतानाच रेबीज प्रतिबंधक लशीचा मात्र मोठा तुटवडा आहे. शहरात गेल्या पाच महिन्यांमध्ये तीन हजार जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्याची नोंद महापालिकेत झाली आहे. श्‍वानदंशानंतर तातडीने रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी रुग्ण सध्या खासगी रुग्णालयांमधून हेलपाटे मारत असल्याचे चित्र दिसत आहे. पण, ही लस मिळण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याची माहिती पुढे येत आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयात पुरेसा साठा 

खासगी रुग्णालयांत रेबीज प्रतिबंधक लशीचा तुटवडा असला, तरीही महापालिकेच्या रुग्णालयात मात्र लशीचा पुरेसा साठा असल्याचा दावा आरोग्य खात्यातर्फे करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ""महापालिकेने नुकत्याच रेबीज प्रतिबंधक 17 हजार डोस खरेदी केले आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या पोचविण्यात आल्या आहेत.'' 

ससूनमध्ये एक महिना पुरेल इतका साठा 

ससून रुग्णालयात एक महिना पुरेल इतका साठा सध्या उपलब्ध आहे. श्‍वानदंशाच्या रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र, या लशीचा सप्टेंबर 2017 मध्ये शेवटचा पुरवठा झाला आहे. त्या वेळी दोन हजार 400 डोस मिळाले होते. त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही तिचा पुरवठा कंपनीकडून झालेला नाही. सध्या 395 डोस शिल्लक आहेत आणि महिन्याला सुमारे 380 डोस रुग्णांना दिले जातात. 

रेबीज प्रतिबंधक लशीची सद्य:स्थिती 
बाजारात उपलब्ध लस ............ 200 
ससून रुग्णालय उपलब्ध लस .... 395 

 

Web Title: After dog bite now tension is for treatment