मेट्रोचा मंजूर नकाशा दिल्यानंतर सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्ष अशास्त्रीय पद्धतीने तोडले आहेत. वृक्षांचे पुनर्रोपण कोठे केले  व नवीन वृक्ष कोठे लावले याची माहिती नाही. कल्याणीनगर येथून मेट्रो गेल्यास येथील वनराई संपुष्टात येईल. 
बाफना, सदस्य, डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य गट 

येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य गटाने सहायक महापालिका आयुक्त तथा वृक्षअधिकारी यांच्यावर केली. तर, बनकर यांनी मेट्रोचा मंजूर नकाशा दिल्यानंतर पुढील सुनावणी घेऊ, असे सांगून बैठक संपविली. 

वडगावशेरी (नगर रस्ता) क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी सकाळी खराडी ते शिवणे रस्त्यासाठी तसेच वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात सुनावणी झाली. या वेळी सहायक महापालिका आयुक्त तथा वृक्षअधिकारी राजेश बनकर व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य गटाचे बिजोय गुहा, मेघना बाफना, महेश गौडेलार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बेकायदा वृक्ष तोड होत आहे. त्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत नाही का, असा प्रश्‍न गुहा यांनी विचारला. 

""वृक्षअधिकारी हा वनपरिक्षेत्र अधिकारी असावा, त्याला वनस्पतीशास्त्राचे ज्ञान असावे, प्रती माणसी 28 वृक्ष, असे प्रमाण आहे. मात्र, पुणे शहरात ते प्रमाण अवघे 1.13 टक्के आहे. जिल्ह्यातील भिगवण, कवडीपाट आणि कल्याणीनगर येथील मुळा-मुठा नदीकाठावर विदेशी पक्ष्यांचे अधिवास आहेत. त्यामुळे कल्याणीनगर येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेचे संरक्षण करण्याची गरज आहे,'' असे गौडेलार यांनी सांगितले. 

मेट्रोचा मंजूर आराखडा उपलब्ध करून देतो. त्यानंतर तुमच्या सुनावणीवर निर्णय घेतो, असे बनकर यांनी सांगितले. 

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्ष अशास्त्रीय पद्धतीने तोडले आहेत. वृक्षांचे पुनर्रोपण कोठे केले  व नवीन वृक्ष कोठे लावले याची माहिती नाही. कल्याणीनगर येथून मेट्रो गेल्यास येथील वनराई संपुष्टात येईल. 
बाफना, सदस्य, डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य गट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After hearing the Metro approved map