Pune News : पुण्यात रंग खेळून नदीवर गेलेल्या 'डीवाय पाटील'च्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

after holi celebration engineering collage student drowned in Indrayani river dhulivandan

Pune News : पुण्यात रंग खेळून नदीवर गेलेल्या 'डीवाय पाटील'च्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

पुणे : राज्यभरात आज धूलिवंदन सण आनंदात साजरा केला जात आहे. पुण्यात मात्र वाईट बातमी समोर आली आहे. रंग खेळून हातपाय धुवायला गेलेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा इंद्रायणी नदीत बुडून मृ्त्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर हे सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. या दरम्यान जयदीपचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला. पाणी खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर सोबतच्या तरुणांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. यानंतर दोन तासाच्या शोधमोहिमेनंतर जयदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Pune News