सतरा नववधुचे दागिने चोरल्यानंतर चोरांना पोलिसांचा लगाम

After stealing jewellery of seventeen bride the thieves were caught by the police
After stealing jewellery of seventeen bride the thieves were caught by the police

लोणी काळभोर (पुणे) : वऱ्हाडी मंडळीच्या वेशात मंगल कार्यालयातील थेट नववधुच्या खोलीत प्रवेश मिळवून, नववधु मेकअप करण्यात गुंतल्यांची संधी साधत नववधुसाठी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या दाम्पत्यांला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (ता. 19) यवत (ता. दौंड) येथील समृध्दी मंगल कार्यालयातून रंगेहात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. 

विलास मोहन दगडे (वय 28 वर्षे) व त्याची पत्नी जयश्री विलास दगडे (वय 25 वर्षे, रा. सध्या खुळेवाडी, चंदननगर, पुणे, मुळगाव शेलगाव वांगी ता. करमाळा जि. सोलापूर) या दोघांना जेरबंद केले असून, विलास दगडे व त्याची पत्नी जयश्री यांनी लोणी काळभोर, सासवड, यवतसह विविध ठिकाणच्या मंगल कार्यालयातून सतरा नववधुचे दागिने चोरल्याची कबुली दिली असून, वरील दाम्पत्याकडून सुमारे एक किलो वजनाच्या सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची रोख रक्कम व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली स्विफ्ट गाडी असा सदतीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुलार, जिल्हा ग्रामिन पोलिसांच्या हद्दीतील मंगल कार्यालयातुन नववधुच्या दागीने चोरी जाण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली होती. मागिल आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सतरा गुन्हे घडल्याने, पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी वरील प्रकारचे गुन्हे रोखण्याबरोबरच, मागिल आठ महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या लोणी काळभोर, सासवड, यवत, राहु, भांडगाव, वालचंदनगर, भांडगाव तळेगाव ढमढेरे, केडगाव, माळेगाव, आतुर, वाघोलीसह राजगड या गावांच्या हद्दीतील मंगल कार्यालयातुन दागिने चोरीला गेलेल्या सतराही गुन्हांचा समांतर तपास करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला दिल्या होत्या. या सुचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, जीवन राजगुरू यांच्यासह सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर यांनी मागील आठ महिन्याच्या कालावधीत गुन्हा घडलेल्या कार्यालयातील सिसिटीव्ही फुटेजची तपासनी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची एक तुकडी सिसिटीव्ही फुटेजची तपासनी करीत असतांना, सहाय्यक फौजदार दयानंद लिमण, राम जगताप, राजेंद्र थोरात, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, शब्बीर पठाण, श्रीकांत माळी, प्रकाश वाघमारे, खंडु निचीत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हातील मोठ्या मंगल कार्यालयावर लक्ष दिले होते. गणेश क्षिरसागर यांच्या पथकाने मंगल कार्यालयातून मिळालेल्या फुटेजमधून काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली टिपल्या असतानांच, यवत परीसरातील समृध्दी मंगल कार्यालयातील लग्नात वधुचे दागिने चोरण्यासाठी स्विफ्ट गाडीतुन नवरा-बायको येणार असल्याची खबर एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पंचवीसहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगल कार्यालयात सापळा रचला. संबधित मंगल कार्यालयातील लग्नाचा मुहर्त जवळ येत असतानाच, स्विफ्ट गाडीतुन विलास दगडे व त्याची पत्नी जयश्री उतरले. मात्र विलास दगडे याचा उच्चभ्रू पोषाख तर जयश्रीच्या अंगावर असणारी महागडी साडी व गळ्यातील दागिने पाहून पोलिस कांही वेळ चक्रावून गेले. मात्र खबऱ्याने दिलेले वर्णन विलास दगडे व त्याची पत्नी जयश्री या दोघांच्याबरोबर मिळते-जुळते असल्याने पोलिसांनी वरील दोघांना गोड बोलून ताब्यात घेतले. सुरवातीला दोघांनीही पोलिसांच्यावर वऱ्हाडी मंडळी असल्याचा रुबाब गाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपल्या पध्दतीने विचारपूस सुरु करताच, दोघांनीही विविध मंगल कार्यालयातून सतरा नववधुचे दागिने व पर्ससह पर्समधील रोख रक्कम, मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. 

चोरीची पध्दत पाहुन पोलिसही चक्रावले...
विलास दगडे व त्याची पत्नी जयश्री हे दोघेही सोलापूर जिल्हातील शेलगाव वांगी (ता. करमाळा) रहिवासी असून, शेलगाव वांगी परिसरातील विलास दगडे यांचे नातेवाईक व भाऊबंद मागिल कांही वर्षापासून मंगल कार्यालयातून नववधुचे दाहिने चोरण्याचा धंदा करतात. पुणे जिल्हातील लग्नांचा थाटमाट पाहून, पुणे शहर व परीसरातील मंगल कार्यातून नववधुचे दागिन्यांची चोरी करणे सोपे जावे म्हणून विलासने चंदननगर भागातील खुळेवाडी परीसरात राहण्यास खोली भाड्याने घेतली होती. लग्न तिथीची माहिती घेऊन, विलास व त्याची पत्नी उच्चभ्रू पोषाखाबरोबरच अंगावर खंडीभर दागिने घालून मंगल कार्यालयात शिरकाव करत असत. लग्न लागण्याच्या वेळेआधी नववधुचा मेकअप चालू असतांना, जयश्री नववधुच्या खोलीत प्रवेश करीत असे. नववधु व तिच्या करवल्या मेकअपमध्ये दंग झाल्याचे लक्षात येताच, दागिने असलेली नववधुची पर्स घेऊन जयश्री पळ काढत असे. एखाद्या लग्नात मिशन फेल गेले तरी चालेल पण दोघेही अत्यंत खबरदारी घेत असल्याने, मागील आठ महिन्यातील सतरा चोऱ्या पचल्या होत्या. 

पोलिस पथकाला पस्तीस हजाराचे इनाम..
अधिक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत बोलतांना संदीप पाटील म्हणाले, नववधुच्या जिवनात लग्न हा अत्यंत भावनिक सोहळा असतो. मात्र या सोहळ्यातच दागिने चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्याने मंगल कार्यालयातून दागिने चोरीला गेलेल्या सतराही गुन्हांचा समांतर तपास करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. यात पोलिस यशस्वी झाले आहेत. सतराही गुन्ह्यातील नववधुचे दागिने व चोरीस गेलेली रोख रक्कम व मोबाईल फोन विलासच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहे. नववधुचे दागिने परत मिळवू शकल्याने, या गुन्हाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाला पस्तीस हजार रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com