"मुक्ताताईंच्या स्वप्नातील..." ; केसरीवाड्यात जाऊन धंगेकरांचे टिळक कुटुंबींयाना आश्वासन - Kasba By Election Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"मुक्ताताईंच्या स्वप्नातील..." ; केसरीवाड्यात जाऊन रवींद्र धंगेकरांचे टिळक कुटुंबींयाना आश्वासन

"मुक्ताताईंच्या स्वप्नातील..." ; केसरीवाड्यात जाऊन रवींद्र धंगेकरांचे टिळक कुटुंबींयाना आश्वासन

Kasba By Election Result : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले, "निश्चितच मुक्ताताईंनी प्रस्तावित केलेली व त्यांच्या स्वप्नातील कसबा घडविण्यासाठी जी जी कामे आवश्यक आहे ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कसबा मतदारसंघ हा कुठल्याही पक्षीय राजकारणामुळे विभागलेला नाही तर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र घेत कसबाच्या विकासाची वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न या पुढील काळात माझा राहील."

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यात भाजपचा सुपडा साफ केला आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. टिळक कुटुंबात भाजपने टिकीट न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कसब्यात भाजपमध्ये नाराजीचे वातावरण होते. 

विजय मिळाल्यानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यावर गेले आहेत. धंगेकर यांनी केसरी वाडा गणपतीच दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची देखील भेट घेतली. 

कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांचे आशीर्वाद घेतले होते. आज निवडून आल्यावर सुद्धा धंगेकर यांनी तत्काळ केसरीवाड्यावर हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

टॅग्स :BjpCongress