पुन्हा पुन्हा हवा महापालिकेत प्रवेश!

पुन्हा पुन्हा हवा महापालिकेत प्रवेश!

सलग पाच, सहा वेळा निवडून येऊनही परत लढण्याची तयारी 

पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या तब्बल ५१ नगरसेवकांना पुन्हा नगरसेवक बनण्याची आस लागली आहे.

त्यात सलग पाच वेळा निवडून आलेल्या आणि सहाव्यांदा महापालिकेत जाऊ इच्छिणाऱ्या तिघांचा समावेश आहे. ‘तरुणांना संधी द्या’ असे एका बाजूने म्हटले जात असताना निम्म्याहून अधिक जुन्या नगरसेवकांचेच चेहरे नव्या सभागृहात दिसण्याची शक्‍यता आहे, तर ‘आमच्यासारख्या अनुभवी सदस्यांची सभागृहाला गरज आहे,’ असे प्रत्युत्तर जुनेजाणते देत आहेत.

सलग पाच वेळा निवडून आलेले तीन जण आता सहाव्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. त्यात माजी उपमहापौर आबा बागूल, कमल व्यवहारे आणि सुभाष जगताप यांचा समावेश आहे. बापूराव कर्णे गुरुजी आणि रवींद्र धंगेकर पाचव्यांदा नगरसेवक होण्यास इच्छुक आहेत. गंमत म्हणजे हे दोघेही आपापल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांकडून निवडणूक लढविणार नसल्याची शक्‍यता आहे. तसेच ११ नगरसेवक चौथ्या ‘टर्म’साठी प्रयत्नशील आहेत. परिणामी तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेले तब्बल ५१ नगरसेवक नव्या सभागृहात प्रवेश करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. नवे सभागृह १६२ सदस्यांचे असल्याने त्यातील निम्म्यापेक्षा अधिक सदस्य जुने राहण्याची शक्‍यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकदा निवडून येणे अवघड असताना काही नगरसेवकांनी लागोपाठ निवडणुका जिंकण्याची किमया साधली आहे. कमल व्यवहारे यांनी तर पाचही वेळा वेगवेगळ्या वॉर्डातून निवडणूक लढवून विजय मिळविला आहे. पाच, चार, तीन टर्म झालेल्या नगरसेवकांची संख्या ३० हून अधिक आहे, तर तिसऱ्यांदा नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांचीही संख्या ३५ पेक्षा अधिक आहे; मात्र दोन सदस्य प्रभागाचे रूपांतर आता चार सदस्य प्रभागात झाल्यामुळे काहींची वाट काटेरी झाली आहे; मात्र सलगच्या निवडणुकांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळविणे, हा सोपस्कार राहिला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. उमेदवारी मिळाली, की अनुभवाच्या आधारे आणि लागोपाठ १५-२० वर्षे नगरसेवक राहिल्यामुळे विजय कसा मिळवायचा, याचा अभ्यास पक्का झाला आहे. त्यामुळे नव्या सभागृहातही पाऊल टाकण्याचा त्यांना विश्‍वास आहे. गेली २५ वर्षे नगरसेवक राहिल्यामुळे महापौरपद वगळता महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे बागूल यांनी भूषविली आहेत. सलग पाच वेळा नगरसेवक झाल्यावर थांबण्याचा निर्णय घेणारे अभय छाजेड यांच्यासारखेही अपवाद आहेच.

नगरसेवक म्हणाले...
महापालिकेत पहिल्यांदा निवडून आल्यावर प्रशासकीय कामकाज, सभागृहाचे कामकाज कसे चालते, हे समजण्यातच दोन-अडीच वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे इच्छा असूनही प्रभागात फारसे काम होत नाही; परंतु दुसऱ्या टर्ममध्ये काम अधिक करता येते. अनुभव वाढल्यामुळे प्रशासकीय खाचाखोचा समजतात आणि विकासकामांना गती देता येते, तसेच महापालिकेतील पदेही मिळविता येतात.

राजकीय वाटचालीसाठी नगरसेवकपद महत्त्वाचे 
दिलीप बराटे, मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, अरविंद शिंदे, बाबूराव चांदेरे, गणेश बिडकर, सुनील कांबळे, बाळासाहेब बोडके, सचिन भगत, राजगुरू आता चौथ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, सुभाष जगताप, अभय छाजेड आदींना नगरसेवकपदावर असताना विधानसभा निवडणूक लढविण्याचीही संधी मिळाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे यांनीही नगरसेवक म्हणून यापूर्वी काम केले आहे. परिणामी राजकीय वाटचाल पुढे सुरू ठेवण्यासाठी नगरसेवकपद महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळेच सुनील बिबवे, श्‍याम देशपांडे, सुनील टिंगरे, श्‍याम सातपुते, उज्ज्वल केसकर, राजाभाऊ गोरडे, शंकर पवार, बाळासाहेब किरवे, राजेंद्र एंडल, बंडू नलावडे असे अनेक माजी नगरसेवकही महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com