पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड; आमदाराची गाडी फोडली?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

पुणे : शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना आता नवीन राहिल्या नाहीत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दरारोज 10-20 गाड्यांची तोडफोड किंवा जाळपोळीच्या घटना घडतात.

पुणे : शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना आता नवीन राहिल्या नाहीत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दरारोज 10-20 गाड्यांची तोडफोड किंवा जाळपोळीच्या घटना घडतात. मात्र, कोथरुडमध्ये इमारतीच्या पार्कींगमध्ये लावलेल्या एका इनोव्हा गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला आहे. संबंधीत गाडीवर 'विधानभवन सदस्य : आमदार ' अशा स्वरुपाचे स्टिकर लावल्याने मुंबईतील एका आमदाराची गाडी फोडण्यात आल्याची चर्चा सुरू होती. 

याप्रकरणी अरुण एखंडे ( रा. घाटकोपर, मुंबई) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडमधील रामनगर परिसरात असलेल्या वनराजी सोसायटीमध्ये फिर्यादी एखंडे यांचे नातेवाईक राहतात. एखंडे यांचे त्यांच्याकडे सातत्याने ये-जा सुरू असते. त्यानुसार एखंडे यांनी एक महिन्यापुर्वी त्यांची इनोव्हा गाडी (एमएच 03, डिजे 9899) इमारतीच्या पार्कींगमध्ये लावली होती.

गुरूवारी सकाळी संबंधीत गाडीची पुढील काच अनोळखी व्यक्तीनी फोडल्याचे निदर्शनास आले. एखाद्याच्या खासगी पार्कींगमध्ये गाडी लावल्यामुळे चिडून हा प्रकार जाणीवपुर्व करण्यात आला असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असतानाही हा प्रकार घडला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, काच फोडलेली इनोव्हा गाडी कोणत्याही राजकीय व्यक्तीची नसल्याचे तसेच एखंडे याचाही राजकीय व्यक्तींशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आमदारांच्या गाडीवरती लावण्यात येणारा स्टिकर खासगी व्यक्तींच्या गाडीवर कसा काय ? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. मात्र मुंबईतील एका आमदाराची गाडी ही गाडी असल्याची चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: again Vehicle damaged in Pune