गुन्हेगारांना चाप लावण्यास आग्रही - नांगरे
खडकवासला - '‘गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी आमची नेहमीच आग्रहाची भूमिका आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत ‘आयएसओ’साठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे,’’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
खडकवासला - '‘गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी आमची नेहमीच आग्रहाची भूमिका आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत ‘आयएसओ’साठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे,’’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
हवेली पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी व त्यानंतर ‘पीएस १००’ हा उपक्रम नांदेड येथे पार पडला. या वेळी नांगरे पाटील बोलत होते. सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष; तसेच नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपअधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलिस निरीक्षक कैलास पिंगळे या वेळी उपस्थित होते. नांगरे पाटील यांचे स्वागत सरपंच गुलाब देडगे यांनी केले.
सरपंच ज्योती सणस, बबनराव कोडीतकर, तुकाराम पायगुडे, मौलवी रफिक सुतार, राहुल घुले पाटील, नंदकुमार मते, ॲड. प्रवीण मते, खुशाल करंजावणे, अजित कारले, अनिता मुनोत यांनी विविध मुद्दे मांडले.
हवेली पोलिस ठाण्याची इमारत हद्दीत नाही. नांदेड व डोणजे येथे पोलिस ठाणे सुरू करावे, नांदोशीच्या खाणीतून दिवसभरात दीडशेहून अधिक ट्रकची ये-जा होते. ट्रक प्रमाणापेक्षा जास्त भरल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना त्याचा त्रास होतो. या ट्रकचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सिंहगडावर दारूपार्टी करणाऱ्यांवर कडक कारवाई झाल्यास, अशा गोष्टींना आळा बसेल. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगळंबे व मांडवी ही गावे शहर आयुक्तालयात जोडावीत. खडकवासला धरण, किरकटवाडी फाटा येथे दर शनिवारी व रविवारी पर्यटक व हॅपी थॉटच्या साधकांमुळे वाहतूक कोंडी होते. दररोज नांदेड फाटा येथील अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी होते, असे मुद्दे या वेळी नागरिकांनी मांडले.
शहरात ड्रग्ज विक्री
शहर परिसरात शाळा, कॉलेजचा कॅम्पस वाढत आहे. डोणजे येथील ‘रेव्ह पार्टीच्या’ पार्श्वभूमीवर परिसरात ड्रग्ज विक्रीसारख्या घटना घडू शकतात, अशी चिंता नांगरे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, दारू, मटका, जुगारासह काही अवैध धंदे व्यवसाय सुरू असल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहनही त्यांनी केले.