Andolan
Andolan

खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत उद्या निर्णय

खेड-शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे आणि खेड- शिवापूर टोल नाका "पीएमआरडीए' हद्दीबाहेर हलविणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी आम्हाला सोमवारी (ता. 16) निर्णय देतील. त्यानंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असा निर्णय रविवारी खेड-शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

खेड-शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीची रविवारी सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी आमदार संग्राम थोपटे, आमदार भीमराव तापकीर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे व्यवस्थापक टी. एन. सिंग, पुणे- सातारा टोल रोडचे अमित भाटिया, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, दिलीप बाठे, माउली दारवटकर, डॉ. संजय जगताप, पोपट जगताप, विलास बोरगे, अमोल पांगारे, ज्ञानेश्वर शिंदे, लहू शेलार, दादा पवार आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच पुणे- सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावरील टोल वसुली थांबवा, नाही तर आम्ही टोल बंद करू, असा पवित्रा आमदार थोपटे आणि तापकीर यांनी घेतला.

पुणे-सातारा रस्ता प्रवासासाठी सुरक्षित आहे का, तुम्ही टोल चौपदरीकरणाचा घेता की सहापदरीकरणाचा, रस्त्याचे काम पूर्ण होण्यात नक्की काय अडचण आहे, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली. मात्र, त्याचे कोणतेही ठोस उत्तर "एनएचएआय' आणि रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही पुणे-सातारा रस्त्यावर "एनएचएआय' आणि रिलायन्स इन्फ्रामुळे भयावह चित्र निर्माण झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. या बैठकीत त्यांनी या रस्त्याविषयीच्या बातम्यांची "सकाळ'मधील काही कात्रणेही दाखवली.

रिलायन्स इन्फ्राला कंटाळून राजीनामा...
या बैठकीला रिलायन्सचे माजी सहव्यवस्थापक बी. के. सिंग उपस्थित होते. रिलायन्स इन्फ्राची काम पूर्ण करण्याची इच्छाच नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीला कंटाळून आपण रिलायन्स इन्फ्राचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत रिलायन्स इन्फ्राने रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा आराखडा दिला आहे. त्या मुदतीत काम पूर्ण होऊच शकत नाही, असेही सांगितले.

टोल हटाव हा धोरणात्मक निर्णय आहे. तसेच, टोलवसुली बंद करणे यावरही ताबडतोब निर्णय देता येणार नाही. मात्र, या संदर्भात वरिष्ठ पातळीवर शिफारस करण्यात येईल. या सर्वांवर एक समतोल ठेवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

"पीएमआरडीए' हद्दीतून टोल नाका हलविणे आणि रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे या दोन प्रमुख मागण्यांविषयी उद्यापर्यंत (ता. 16) आम्हाला योग्य निर्णय जिल्हाधिकारी देतील. त्यानंतर लगेचच आमच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.
- संग्राम थोपटे, आमदार, भोर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com