भानगिरेंचे आंदोलन पाण्यासाठी की, निवडणुकीसाठी

ज्ञानेश सावंत
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी भल्यामोठ्या टाकीवर जाऊन बुधवारी 'शोले स्टाइल' आंदोलन केले.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना लोकांचा कधी आणि कसा कळवळा येईल, याचा नेम नाही. अशा इच्छुकांनी पाऊल उचलण्याआधीच त्यांचे उतावीळ कार्यकर्ते चार पावले पुढे टाकत आहेत. असाच अनुभव हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांकडून आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी सारी धरणे भरून वाहत असतानाही भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी पुरविण्याच्या मागणीसाठी भल्यामोठ्या टाकीवर जाऊन बुधवारी 'शोले स्टाइल' आंदोलन केले. हे आंदोलन करीत असताना आपण भानगिरेंचे कार्यकर्ते आहोत, हे ठळकपणे लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या शिवसेनेच्या आंदोलनाची चर्चा शहरात रंगली आहे. 

शहरालगतची चार धरणांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला रोज एकवेळ पुरेसा पाणीपुरवठा केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु, हडपसरमधील काही भागांत विशेषत: महमदवाडी आणि परिसरात अपुरा आणि अवेळी पाणीपुरवठा होत असल्याचा आक्षेप भानगिरेंचा आहे. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून भानगिरे सतत आक्रमक पवित्रा घेत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात पूरस्थिती असतानाही भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तेवढ्यावर न थांबता प्रशासनाने शब्द पाळला नसल्याचा आरोप करीत भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी पुन्हा रामटेकडीतील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर गेले. आंदोलनादरम्यान या कार्यकर्त्यांनी भलताच उतावीळपणा दाखवत, टाकीवर उड्या मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी "पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे'' अशी घोषणाबाजी करीत परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही आंदोलनकर्त्यांनी केला. 

भानगिरे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. याआधी 1014 च्या निवडणुकीत भानगिरे यांनी मनसेकडून निवडणूक लढविली होती. आता ते पुन्हा शिवसेनेत आले असून, स्थानिकांचे प्रश्‍न घेऊन आंदोलन करण्यावर त्यांचा भर असतो. मात्र, आता पाणी टंचाई नसतानाही भानगिरे यांनी आंदोलन का केले, याचीच चर्चा आहे. आपल्या नेत्याचा असाही प्रचार होईल, या भाबड्या आशेतून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाण्याचे धाडस दाखविल्याचे दिसून येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation of the Bhangire is for water or for elections