नागरिकत्व कायद्याचे शहरात पडसाद

जंगली महाराज रस्ता - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरासमोर निदर्शने करण्यात आली.
जंगली महाराज रस्ता - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरासमोर निदर्शने करण्यात आली.

पुणे - नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे पडसाद रविवारी पुणे शहरात उमटले.

शहर भाजपच्या वतीने या दुरुस्ती विधेयकास पाठिंबा देण्याबरोबरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शहरात आंदोलन करण्यात आले; तर केंद्र सरकारच्या निषेधार्थ ऑल इंडिया प्रॉफेशनल काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शहरातील आसाम पीपल्सच्या नागरिकांवर आंदोलन स्थगित करण्याची वेळ आली.

केंद्र सरकारने नुकतेच नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक नुकतेच मंजूर केले. त्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. पुणे शहरात देखील या विधेयकावरून राजकीय पक्षांनी आंदोलनांचा धडाका लावला. 

भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

या वेळी मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाली होते. भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पूरम चौकात आंदोलन करण्यात 
आले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने सकाळी बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. लेखा नायर, गिरीश राव, रमेश अय्यर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्ली येथे पक्षाच्या वतीने आयोजित देशव्यापी मोर्चासाठी शहर काँग्रेसचे पदाधिकारी गेले आहेत. ते आल्यानंतर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत, असे प्रसिद्धीप्रमुख रमेश अय्यर यांनी सांगितले. 

नोकरी-व्यवसायानिमित्त मूळचे आसाममधील असलेले आणि पुणे शहरात राहणाऱ्या आसामी नागरिकांकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज दुपारी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन रद्द करण्याची वेळ त्या नागरिकांवर आली. एकूणच आज दिवसभर शहरातील राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले.

आसामी नागरिकांचे आंदोलन दडपले
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ पुण्यातील आसामी नागरिकांनी आयोजित केलेले आंदोलन पोलिसांनी दडपले. पोलिसांनी त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारली.
आसामी नागरिक रविवारी दुपारी चार वाजता फर्ग्युसन महाविद्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी एकत्र येणार होते. त्यासाठी डेक्‍कन पोलिस ठाण्यातून परवानगी घेतली होती. मात्र, परवानगी मिळताच अवघ्या काही वेळेत त्यांना परवानगी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. 

निदर्शनाचे आयोजक बिद्युत सैकीया म्हणाले, ‘‘कॅबच्या मंजुरीमुळे आसाममध्ये काय स्थिती आहे, तेथील लोकांची भावना काय आहे, हे पुण्यातील नागरिकांना समजून सांगणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने नागरिकांना विश्‍वासात न घेता हा कायदा केला आहे.’’

‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लाखो घुसखोर आसाममध्ये आले आहेत. त्याचा दबाव येथील मूळ स्थानिक लोकांवर निर्माण झालेला आहे. असे असताना आता बाहेरच्यांना भारताचे नागरिकत्व दिले जात आहे. त्याचा दुर्गामी परिणाम तेथील स्थानिक आसामी लोकांवर होणार आहे. त्यामुळे यास विरोध करणे गरजेचे आहे,’’ असेही ते म्हणाले.

आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. त्यांनी काही वेळाने परवानगी नाकारल्याचे पत्र आम्हाला दिले आहे. पोलिसांनी आमचा संविधानिक हक्क नाकारला आहे, असे सैकीया यांनी सांगितले.

आंदोलनासाठी आधी परवानगी दिली होती. देशात सर्वत्र वातावरण गंभीर असल्याने पुण्यातही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परवानगी नाकारली आहे. 
- दीपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com