धनगर समाजाचे भिगवण येथे आंदोलन

प्रशांत चवरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

भिगवण : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करुन त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्विकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून शासनापर्यत पोचविण्यात आली. बंद न करण्याच्या धनगर समाजाच्या भुमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले. 

धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने सोमवारी येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवानी एकत्र येऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, धनाजी थोरात, संपत बंडगर, आबासाहेब बंडगर, संजय देवकाते, सतिश शिंगाडे, अरविंद देवकाते, अमित देवकाते, डॉ. तुळशीराम खारतोडे, कुंडलिक बंडगर, जिजाराम पोंदकुले, तेजस देवकाते, अण्णा धवडे, अतुल देवकाते, सुरेश बिबे व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा समावेश हा अनुसुचित जमातीमध्येच आहे परंतु धनगड व धनगर असा वाद निर्माण करुन धनगर समाजाला मागील सत्तर वर्षे आरक्षणापासुन वंचित ठेवल्याची भावना यावेळी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दयावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेले परमेश्वर घोंगडे यांचे कुटुंबास २५ लाखांची आर्थिक मदत करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांची  थकीत शिष्यवृत्ती तात्काळ अदा करावी, मेंढपाळांना गायरान जमिनी राखीव ठेवाव्यात, पावसाळ्यात वनजमीनीवर मेंढपाळांना चराई कुरणे राखीव ठेवावीत आदी मागण्या करण्यात आल्या. समाजाच्या मागण्यांचे निवेदन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. आंदोलनासाठी भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीनो चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.               

Web Title: agitation by dhangar community in bhigwan