बारामतीत 16 जुलैचे दूधदरासाठीचे आंदोलन तीव्र होणार

संतोष शेंडकर
शनिवार, 14 जुलै 2018

सोमेश्वरनगर : दूधदरासाठी 16 जुलैला स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात येथील शेतकरी कृती समितीने उडी घेतली आहे. कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली करंजेपूल येथे तर कल्याण भगत यांच्या नेतृत्वाखाली कोऱ्हाळे बुद्रुक येथे आंदोलन होणार आहे. दरम्यान, स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण हे बारामती शहरात आंदोलन करणार आहेत. यामुळे बारामती तालुक्यात आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 16 जुलैला शहरांचा दूधपुरवठा रोखण्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. विधानपरिषदेत पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी दूधभुकटीला प्रतिकिलो पन्नास रूपये अनुदान देण्याची घोषणा केली. तरीही आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून शेतकऱ्याला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान थेट खात्यावर द्यावे यासाठी राज्यभर आंदोलन होणार आहे.

या आंदोलनात शेतकरी कृती समिती सक्रीय झाली आहे. कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सरकारने दूधउत्पादकांना वेठीस धरले असून 16 ते 18 रूपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. उत्पादक तोट्यात असून रास्त भावासाठी 16 जुलै रोजी करंजेपूल व कोऱ्हाळे येथे आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्या दिवशी दूधसंकलन केंद्रास दूध देऊ नये, दूध नष्ट न करता घरीच वापरावे. शहरी भागात दूध गेले नाही तरच सरकारला जाग येईल.

कृती समितीच्या निर्णयामुळे बारामतीच्या पश्चिम भागातील सुमारे एक लाख लिटर दूधसंकलन रोखले जाणार आहे. याशिवाय स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरात होणाऱ्या आंदोलनामुळेही दूधसंकलन रोकले जाणार आहे. याशिवाय तालुक्यातील काही सहकारी व खासगी संस्थाही आंदोलनास पाठींबा देणार असल्याचे समजते. यामुळे पुणे जिल्ह्यात बारामती हाच दूधदर आंदोलनाचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: The agitation for the milk-related movement of Baramati on July 16 will be severe