
खेड-शिवापूर टोल नाक्यावर सक्तीने सुरू असलेली टोल वसुली व स्थानिक नागरिकांना होत असलेली दादागिरी याबाबत टोलनाका संघर्ष समितीने आंदोलनाचे पाऊल उचलले.
Khed Shivapur Toll Naka : खेड-शिवापुर टोलनाक्यावर २ एप्रिलला सर्वपक्षीय आंदोलन
नसरापूर - खेड-शिवापूर टोल नाक्यावर सक्तीने सुरू असलेली टोल वसुली व स्थानिक नागरिकांना होत असलेली दादागिरी याबाबत टोलनाका संघर्ष समितीने आंदोलनाचे पाऊल उचलले असून, येत्या 2 एप्रिलला टोलनाका संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय तीव्र आंदोलन टोल नाक्यावर होणार आहे, अशी घोषणा संघर्ष समितीच्या आजच्या बैठकीत करण्यात आली.
खेड शिवापुर टोलनाका हटाव बाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी टोल नाका हटाव संघर्ष समितीची बैठक आज केळवडे येथे पार पडली.
या बैठकीत खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या टोलवसुलीबाबत नागरीकांमधे संतप्त भावना तयार झाली असुन, टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जाणीवपुर्वक बाजुला ठेऊन महामार्ग प्राधिकरण टोलवसुली सक्तीने करीत आहे. अशी भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
'खेड-शिवापूर टोलनाका स्थलांतरीत करण्याची मागणी जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून होत असुनही महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासन मुजोरी करीत आहेत. यापुर्वी केलेल्या आंदोलनामधे टोल प्रशासनाने दिलेला शब्द फिरवला आहे. आता टोलनाक्याचा अंतिम लढा २ एप्रिल रोजी टोलनाक्यावर दिला जाईल. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावागावात जाउन आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन कृतीसमितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी केले आहे.
तर आपण आधी भुमीपुत्र आहोत, नंतर पक्षाचे पदाधिकारी आहोत. ही लढाई श्रेयवाद किंवा पक्षभेदात अडकून रहाता कामा नये अशी अपेक्षा कृती समितीचे डॉ. संजय जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी प्रत्येक पक्षाच्या तालूका निहाय आंदोलकांच्या समितीची स्थापना करण्यात आली. व आंदोलनासाठी सर्वपक्षीय मेळावे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधे घेण्यात येणार असुन, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, किसान मोर्चा या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्या विरूद्ध एल्गार केला.
या बैठकीला निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड माजी सभापती लहुनाना शेलार, भाजप तालुकाध्यक्ष जिवन कोंडे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली शिंदे, हनुमंत कंक, युवा सेनेचेआदित्य बोरगे, वेल्हे तालुकाप्रमुख दिपक दामगुडे, भरत किन्हाळे, राष्टशक्ती संघटनेचे शहाजी अरसुळ, रामभाऊ मांढरे, गोरख मानकर, शुभम यादव, अरविंद सोंडकर, दादा पवार, दादा आंबवले, महेंद्र भोरडे, आदी उपस्थित होते.
यावेळी होणारे आंदोलन आर या पार असेच होणार असुन टोल नाक्यावर दादागिरी होते, त्रास होतो, असे म्हणत घरात न बसता नागरीकांनी या होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आपली स्थानिक ताकद दाखवावी व टोल आपल्या हद्दीतुन हद्दपार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.