छत्तीस चारीचे चौकशी अहवालाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडा

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 15 एप्रिल 2018

छत्तीस चारीच्या कामाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी केली आहे.

भिगवण - इंदापुर व बारामती तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी महत्वपुर्ण असलेल्या छस्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन या कामाची अनेकवेळा चौकशी झाली. परंतु चौकशीचे पुढे काय झाले? चौकशीमध्ये कोणी दोषी आढळले काय? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. छत्तीस चारीच्या कामाबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत संतोष सोनवणे व शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेकडे निवेदनाद्वारे छस्तीस चारीबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडण्याची व दोषींवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. इंदापुर तालुक्यातील मदनवाडी व बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी, पारवडी आदी गावांसाठी 36 चारीच्या कामास शासनाने मंजुरी दिली होती. काम निकृष्ट दजार्चे झाल्याच्या तक्रारावरुन आत्तापर्यत विविध स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामाची पाच वेळा चौकशी झाली आहे. चौकशीसाठी अधिकारी येतात चौकशी करतात शेतकऱ्यांशी चर्चा करतात व ठराविक दिवसानंतर चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले जाते. छस्तीस चारीचे काम हे मागील दोन वर्षापासुन चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. विविध चौकशांचे पुढे होते काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. सध्या छस्तीस चारीच्या विविध समित्यांच्या माध्यमातून  झालेल्या चौकशीची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर ठेवावी अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

याबाबत संतोष सोनवणे म्हणाले, छस्तीस चारीचे काम पुर्ण होऊन शेतामध्ये पाणी येईल अशी आशा मागील तीस वषार्पासुन येथील शेतकरी बाळगुन आहे. निकृष्ट कामामुळे येथील शेतकऱ्यांना कधीच पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. छत्तीस चारीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे. या कामाची चौकशी अनेकदा करण्यात आली आहे परंतु त्याबाबत नेमकी काय कार्यवाही केली याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही माहीती नाही. चौकशी अहवालाबाबतची व कार्यवाहीबाबतची वस्तुस्थिती शेतकऱ्यांसमोर मांडावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Agricultural irrigation enquiry report