कृषी पर्यटनाला जाऊन व्हा ‘रिलॅक्‍स’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कृषी विभाग आणि पर्यटन विभाग यांनी एकत्रितरीत्या २०१३ मध्ये कृषी पर्यटन धोरण तयार केले. या धोरणाचा मसुदा गेल्या चार वर्षांपासून सरकार 
दफ्तरी पडून आहे. हे धोरण प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारने ठोस पावले 
उचलणे अपेक्षित आहे.  
- बाळासाहेब बराटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ

पुणे - जात्यावर दळणं...भातलागवड करणं...बैलगाडीवरील सफर अनुभवणं असो वा शेतात चुलीवर भाकरी थापण्याचा अनुभव असो अशा प्रकारे ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘कृषी पर्यटन’ शहरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. म्हणूनच कृषी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक काळानुरूप बदल करू पाहत आहेत. त्यामुळे आता तुम्ही एखाद्या कृषी पर्यटन केंद्रावर गेलात, तर तुम्हाला ग्रामीण वेशभूषेपासून ते शेतातील विविध कामे करण्याचा अनुभव मिळेलच; परंतु त्याबरोबरच तुमचा मोबाईलदेखील काही कालावधीसाठी ‘आउट ऑफ रेंज’ जाईल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही ‘रिलॅक्‍स’ होऊ शकाल, अशी सोय सध्या कृषी पर्यटक व्यावसायिक करत आहेत. 

शहरवासीयांना ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणारे असे हे ‘कृषी पर्यटन’. राज्यात जवळपास ३५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. ही सर्व केंद्र महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महसंघामार्फत (मार्ट) जोडली गेली आहेत. राज्यात असणाऱ्या एकूण केंद्रांपैकी ५० टक्के केंद्र ही पाच एकरपेक्षा अधिक शेतात विस्तारली आहेत. सर्व केंद्रांचे मिळून अंदाजे १४ कोटी रुपये असे वार्षिक उप्तन्न असेल, असे ‘मार्ट’चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांचे म्हणणे आहे.

कृषी पर्यटन केंद्र ही यापूर्वी केवळ शेतात जाऊन जेवण किंवा जेवण बनविणे यापुरती मर्यादित होती. त्यानंतरच्या काळात कृषी पर्यटन केंद्रावर ग्रामसंस्कृतीचे वैभव दाखविणारे बदल करण्यात आले. शहरातील पर्यटकांना मोबाईल, सोशल नेटवर्किंग साइटस्‌ यांच्यापासून विश्रांती हवी असते, म्हणून ते ‘आउट ऑफ रेंज’ अशा ठिकाणांच्या शोधात असतात, त्यामुळे बहुसंख्य व्यावसायिक पर्यटकांची ही गरज भागविण्याच्या प्रयत्नात आहेत. 

कृषी पर्यटन धोरणातील महत्त्वाचे मुद्दे
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ‘कृषी पर्यटन केंद्रा’ला मान्यता द्यावी.
चार टक्के चटई क्षेत्र निर्देशांक निश्‍चित करावा. 
वीजबिल आणि गॅसचे दर घरगुती दराने आकारावेत
मनोरंजन, व्यवसाय, सेवा अशा विविध करांतून सवलत मिळावी
 केंद्राला अनुदान देण्याची सोय हवी   कृषी पर्यटन केंद्राचे ‘मार्केटिंग’ शासन स्तरावरून व्हावे

नवे ट्रेंड
सेंद्रिय शेतीतील ‘फूड’ला पसंती  शहरवासीयांना जात्यावरील दळणं वाटतंय सुखद
भात लावणे आणि कापणे  चुलीवर भाकरी करणे  धान्य पाखडणे

Web Title: Agricultural Tourism