बारामतीत "गुड न्यूज' (व्हिडिओ)

शारदानगर (ता. बारामती) : अमेरिकन उच्च दुधाळ आनुवंशिकता असलेल्या गाईंच्या भ्रूणांचे हस्तांतर करण्यात आलेल्या गाई.
शारदानगर (ता. बारामती) : अमेरिकन उच्च दुधाळ आनुवंशिकता असलेल्या गाईंच्या भ्रूणांचे हस्तांतर करण्यात आलेल्या गाई.

(पुणे) : ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सहा वर्षांपूर्वी अमेरिकेतून आयात केलेल्या उच्च आनुवंशिकतेच्या होल्स्टिन वंशाच्या गाईच्या भ्रूणाचे प्रत्यारोपण (एम्ब्रियो ट्रान्स्फर) यशस्वी झाले असून, शारदानगरमधील या प्रयोगात सध्या सात सरोगेट गाई "गर्भवती' आहेत. ही "गुड न्यूज' ऐकून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ट्रस्ट, कृषी महाविद्यालय व पशुसंवर्धन महाविद्यालयाच्या सर्वच पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची कौतुकाने पाठ थोपटली.

प्रत्यारोपणातील प्रयोगाला वेगळा आयाम देणारा हा प्रयोग असून, या प्रयोगाची गेली सहा वर्षे प्रतीक्षा केली होती. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून सहा वर्षांपूर्वी उच्च आनुवंशिकतेच्या गोधनासाठी हे भ्रूण अमेरिकेतून आयात केले होते. ते भ्रूण द्रवनत्रामध्ये साठविले होते. 30 जुलै 2018 रोजी ट्रस्टच्या शारदानगर येथील शेतीफार्मवरील आठ गाईंमध्ये हे भ्रूण पुण्याच्या जे. के. बोव्हाजेनिक्‍सचे शास्त्रज्ञ डॉ. श्‍याम झंवर व डॉ. विनोद पाटील यांच्या सहकार्याने हस्तांतर करण्यात आले. 29 सप्टेंबर 2018 रोजी या आठ गाईंची सोनोग्राफी करण्यात आली. त्यातून आठपैकी सात गाई गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले आहे. भ्रूणाची वाढ योग्य व सुदृढ पद्धतीने असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे.
भारतात दुधाळ व उच्च आनुवंशिकता असलेल्या जनावरांची पैदास करण्याच्या ट्रस्टच्या 50 वर्षांतील स्थापनेमागील उद्देशानुसार या प्रयोगाची वाटचाल सुरू आहे. येत्या काही दिवसांतच या होल्स्टिन गाई बारामतीकरांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील गोपालकांना एक "गुड न्यूज' देतील. शारदानगरच्या या प्रयोगावर सध्या डॉ. धनंजय भोईटे, डॉ. रतन जाधव, डॉ. पिसाळ, डॉ. सचिन सोरटे, हरिभाऊ जराड अशोक काटे, पशुसंवर्धन महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींचे पथक लक्ष ठेवून आहे.

शरद पवार यांच्याकडून कौतुक
सात गाई गर्भवती असल्याची खूषखबर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कानावर जाताच त्यांनी हा प्रयोग किती महत्त्वाचा आहे, हे ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितला. दुधाच्या उत्पादनात प्रगती करण्यासाठी असे प्रयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल सर्वांचे कौतुक केले.

भारतात उच्च आनुवंशिकतेच्या गाईंची गरज आहे, मात्र सध्या उच्च भ्रूण आयात होत नाहीत. अशा स्थितीत आयव्हीएफ तंत्राने किंवा एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्राने उच्च दुधाळ आनुवंशिकता असलेली जनावरे पैदास करता येतील. त्यांच्यामार्फत दुधाच्या उत्पादन वाढीतील गोवंशाचा प्रसार होऊ शकेल, त्यासाठी हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.
- राजेंद्र पवार, प्रमुख, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती

गोठित केलेले भ्रूण दीर्घ काळानंतर सरोगेट गाईमध्ये वापरायचे झाल्यास त्याच्या यशस्वितेचे प्रमाण हे 40 टक्‍क्‍यांपर्यंत असते. मात्र बारामतीतील हे प्रमाण निश्‍चितच सुखावणारे आहे. बारामतीतील अधिकाऱ्यांच्या पथकाने गर्भ हस्तांतरासाठी सरोगेट गाईंची केलेली देखभाल महत्त्वाची ठरली.
- डॉ. श्‍याम झंवर, शास्त्रज्ञ, जे. के. बोव्हाजेनिक्‍स

खरेतर या प्रयोगाने आशा खूप उंचावल्या आहेत. आपल्याकडील खिलार, गीर, देवणी, साहिवाल अशा देशी व त्यातील उच्च प्रतीच्या गाईंची दुधाळ आनुवंशिकता वाढविण्याच्या दृष्टीने या प्रयोगाने नव्याने आशा निर्माण करून दिलेली आहे.
- प्रा. नीलेश नलावडे व डॉ. धनंजय भोईटे, प्रमुख सेंटर ऑफ एक्‍सलन्स डेअरी

भारतातील होल्स्टिन गाई :
सध्या
प्रतिदिन दूध : 20 ते 22 लिटर
प्रयोगानंतर
प्रतिदिन दूध : 40 ते 45 लिटर

देशातील गायींची संख्या : 185 दशलक्ष
दूध उत्पादन

सरासरी प्रतिगाय 6 ते 7.5 लिटर
एकूण उत्पादन 176.35 दशलक्ष टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com