शेतीतील आधुनिकता कौतुकास्पद - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बारामती - ‘शेतीतील नवी पिढी आधुनिकता स्वीकारत असून, स्वतः पुढे जाताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही पुढे जाण्यासाठी हातभार लावतात, हे कौतुकास्पद आहे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

बारामती - ‘शेतीतील नवी पिढी आधुनिकता स्वीकारत असून, स्वतः पुढे जाताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही पुढे जाण्यासाठी हातभार लावतात, हे कौतुकास्पद आहे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

शारदानगर (ता. बारामती) येथे आज पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या १८ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पवार यांनी वरील मत व्यक्त केले. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्‍वस्त सौ. सुनंदा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संजय भोसले, मराठवाडा शेती मंडळाचे विश्‍वस्त विजय बोराडे, अकोला विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. नारायण हेगडे, माजी अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ अशोक गायकवाड, डॉ. एस. एन. जाधव, डॉ. सुदाम अडसूळ, ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, रणजित पवार, डॉ. अविनाश बारवकर, विष्णूपंत हिंगणे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांनी शेतीत संपूर्ण आयुष्य खर्च केले. पाणी, आधुनिक शेती, संकरित जनावरे, दूध उत्पादन, प्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय, हे विषय त्यांच्या आवडीचे होते. या विषयांमध्ये जगभरात जिथे अधिक संशोधन झाले, जिथे अधिक माहिती मिळेल, तिथे जाऊन अभ्यास करण्याचे काम त्यांनी केले. ते ज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवले. आज स्थिती बदलत आहे. जे पीक आपण घेतो, त्याचा उत्पादन खर्च कमी व उत्पादकता वाढविण्यावर भर दिला पाहिजे. एकेकाळी आयात केलेल्या डाळी, तांदूळ याच्यासारखे अन्न आज निर्यात होत आहे. अशावेळी नव्या जातींची लागवड व शेतात संमिश्र पिके; तसेच आंतरपिके घेऊन अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल.’’ 

राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांनी शेती व शेती विकासावर आयुष्यभर काम केले. आज अनेकविध कारणांनी कळत नकळत शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे, ती निराशा जावी व प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रेरणा मिळावी, या हेतूने अप्पासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दरवर्षी चैत्रपालवीमध्ये राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.’’
या वेळी विद्यार्थ्यांचा व प्रयोगशील शेतकऱ्यांना डॉ. अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

‘अप्पासाहेबांचे मोठे योगदान’
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. मणिभाई देसाई व अप्पासाहेब हे हरितक्रांतीतील अग्रदूत होते. शेतीसाठी, आधुनिकतेसाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे, ठिबकद्वारे पाणी देणे, यासाठी अप्पासाहेबांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यानंतरही हे काम राजेंद्र पवार अधिक वेगाने पुढे नेत आहेत, हे कौतुकास्पद आहे.’’

भाजीपाला, फळांसाठी आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर असलो, तरी योग्य बाजारपेठ मात्र उपलब्ध नाही, ती शोधून आपला शेतमाल जगाच्या नव्या बाजारात पोचविण्यासाठी पावले उचलावी लागतील.
 - शरद पवार,माजी केंद्रीय कृषिमंत्री

Web Title: agriculture Modernity sharad pawar