शेतीमाल निर्यातवाढीसाठी दहा देशांत कृषी वैज्ञानिक

शेतीमाल निर्यातवाढीसाठी दहा देशांत कृषी वैज्ञानिक

नारायणगाव - ‘‘लागवड नियोजनाअभावी कृषिमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी कृषिमालाच्या निर्यातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या नियोजनासाठी दहा देशांत कृषी वैज्ञानिकांची नेमणूक करण्यात आली आहे,’’ अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ३ जानेवारी ते सहा जानेवारीदरम्यान चार दिवस ग्लोबल फार्मस या अंतर्गत कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन पटेल यांच्या हस्ते, माती, पाणी व पाणदेठ परीक्षण प्रयोगशाळेच्या विविध विभागाचे उद्‌घाटन कृषी आयुक्त सचींद्र प्रताप सिंह, आमदार शरद सोनवणे, गटनेत्या आशा बुचके यांच्या हस्ते झाले. 

या वेळी कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शेतकरी, कृषी अधिकारी, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. या वेळी आयसीआर पुण्याचे संचालक डॉ. लाखन सिंग, जिल्हा कृषी अधिकारी सुनील खैरनार, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, विश्‍वस्त नंदा डांगे, उपाध्यक्ष सुरेश संचेती, कार्यवाह रवींद्र पारगावकर, डॉ. आनंद कुलकर्णी, शशिकांत वाजगे, तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना फसवले आहे. शेतात माल असेपर्यंत विमा कंपनीने नुकसानीची हमी घेणे आवश्‍यक आहे. कर्जमाफी देऊन शेतीचे प्रश्‍न सुटणार नाहीत. शाश्‍वत शेती उत्पन्नासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’

मेहेर म्हणाले, ‘‘केव्हीकेने शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवले आहे. भांडवली खर्च कमी करण्यासाठी माती, पाणी, पाणदेठ तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारली आहे.’’

या वेळी डॉ. लाखन सिंग, बुचके यांची भाषणे झाली. मेहबूब काझी, सुनील ढवळे यांनी सूत्रसंचालन  केले. शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, राहुल घाडगे यांनी नियोजन केले.

‘...म्हणून कांद्याचे उत्पादन वाढले’
कांद्याच्या बाजारभावाबाबत पाशा पटेल म्हणाले, ‘‘२६ राज्यांत कांदा उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात साखर कारखाने बंद झाल्याने उसाऐवजी कांदा पीक घेतले जात आहे. पीक लागवडीचे विभागनिहाय नियोजन केल्याशिवाय शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न सुटणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com