अहिंसा चौकात वाहतूक कोंडी "जैसे थे'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पिंपरी - दीड ते दोन महिन्यांपूर्वी चिंचवड येथील अहिंसा चौक परिसरात वाहतूक पोलिसांनी रात्री साडेआठपर्यंत खासगी बस थांबण्यास बंदी घातली होती. बंदीनंतर काही दिवस स्थितीत फरक पडलाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चौकातील परिस्थिती पुन्हा "जैसे थे' असल्याचे दिसून आले.

पिंपरी - दीड ते दोन महिन्यांपूर्वी चिंचवड येथील अहिंसा चौक परिसरात वाहतूक पोलिसांनी रात्री साडेआठपर्यंत खासगी बस थांबण्यास बंदी घातली होती. बंदीनंतर काही दिवस स्थितीत फरक पडलाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चौकातील परिस्थिती पुन्हा "जैसे थे' असल्याचे दिसून आले.

चिंचवड स्टेशन ते चिंचवड गावाच्या दिशेला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाजवळ अहिंसा चौक आहे. या चौकाच्या परिसरात बोहरगावी जाणाऱ्या खासगी प्रवासी बस थांबलेल्या असतात. या प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे आपली वाहने चौकातच लावतात. प्रवासी बस थांबल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. त्यामुळे अन्य वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पोलिसांनी हटकल्यास खासगी बसचालक हुज्जत घालत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. दुसरीकडे, या प्रवासी बस व्यावसायिकांवर ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरातील काही इमारतींच्या पार्किंगमध्येच दुकाने आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहने रस्त्यावरच लावावी लागतात.

या संदर्भात सुरेंद्र घाटपांडे या नागरिकाने सांगितले, 'अहिंसा चौकातून मी अनेकदा ये-जा करतो. सायंकाळी साडेसातनंतर या चौकात खासगी प्रवासी बसची वाहतूक सुरू होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो; तसेच श्रीधरनगरकडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावर असलेल्या हातगाडी व्यावसायिकांवरही महापालिकेने कारवाई करायला हवी. महापालिका, वाहतूक पोलिस यांनी मिळून संयुक्तपणे कारवाई करायला हवी.''

वाहतूक पोलिसांकडून खासगी प्रवासी बसला अटकाव केला जातो. मात्र, रात्री नऊनंतर कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येतात. मात्र, यापुढे रात्रीही या प्रवासी बस थांबणार नाहीत, यासाठी ट्रॅफिक वॉर्डनला सूचना देण्यात येतील. चौक परिसरातील हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाला अनेकदा पत्र दिले आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही.
- संजीव पाटील, वाहतूक निरीक्षक, चिंचवड वाहतूक विभाग

Web Title: Ahinsa Chowk Traffic