वृद्ध दांम्पत्याला हवे 'इच्छामरण'! चरितार्थ चालविणे झाले अवघड 

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 20 जुलै 2017

तहसीलदारांकडे परवानगी मागितली 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील रहिवाशी असलेल्या एका वृद्ध दांपत्याने इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. तशा आशयाचा अर्ज त्यांनी संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे दिला आहे. संपतराव आनंदराव कुळधरण ( वय ७३ ) व सखुबाई संपतराव कुळधरण ( वय ७० ) असे या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. वर्षभरापासून श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळणे बंद झाल्याने चरितार्थ चालविणे अवघड बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 माळेगाव हवेली येथील कुळधरण दांपत्याने आपली राज्य सेवा निवृत्ती पेन्शन बंद झाल्याचा अर्ज ता. २० सप्टेंबर २०१६ रोजी संगमनेरच्या तहसीलदारांकडे करून पेन्शन पूर्ववत चालू करण्याची मागणी केली होती. या वृध्द दांपत्याने बँकेत व तहसीलदार कार्यालयात वारंवार हेलपाटे मारले, उंबरठे झिजविले मात्र तुम्हाला नंतर कळवू असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे वर्षभरापासून आमची उपासमार होत असून उपजिविका व चरितार्थ चालविणे अवघड बनले आहे.

श्रावणबाळ योजनेचे पैसे सोडून आमच्याकडे चरितार्थासाठी दुसरे साधन नाही. वर्षभरापासून पेन्शन बंद असल्याने उपासमार होत आहे. त्यामुळे आम्हाला इच्छा मरणास परवानगी द्यावी, अन्यथा संगमनेर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही कुळधरण दांपत्याने दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी १७ जुलै रोजी संगमनेरच्या तहसीलदारांसह प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या आणखी बातम्या :
शेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी
बहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान
कोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ
जामिनासाठी पैसे मागणारा लाचखोर पोलिस अधिकारी 'ACB'च्या जाळ्यात
आधी वेतनवाढ; मग शेतकऱ्यांवरील चर्चा; खासदारांची आग्रही भूमिका
 

Web Title: Ahmednagar news old couple wants mercy killing euthanasia