हवेचे प्रदूषण पाहता येणार 'डिस्प्ले बोर्ड'वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

पुण्यात ‘नॅशनल क्‍लीन एअर प्रोजेक्‍ट’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा उद्देश निश्‍चित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत प्रदूषणाची पातळी मोजणाऱ्या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ‘नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ (निरी), ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांची मदत घेण्यात येत आहे.
- दिलीप खेडकर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे विभाग

पुणे - तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील ‘रिअल टाइम’ हवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) ‘डिस्प्ले बोर्ड’ बसविण्यात येणार आहेत.

पुण्यात सध्या कोणत्या घटकामुळे किती प्रदूषण होते, याची नेमकी माहिती नाही. स्वयंचलित वाहनातून उत्सर्जित होणारा धूर, रस्त्याच्या कडेला जागोजागी जाळलेल्या कचऱ्यातून होणारे प्रदूषण, रस्त्याच्या कडेची धूळ अशा वेगवेगळ्या प्रकारांतून नेमके किती आणि कसे प्रदूषण होते, याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वित्झर्लंडने मदतीचा हात पुढे केला आहे. त्या अंतर्गत पुढील नऊ वर्षांसाठी हा प्रकल्प पुण्यात राबविण्यात येणार आहे. 

प्रकल्पाचा पहिला टप्पा
पुण्यात साडेचार वर्षांचा हा पहिला टप्पा आहे. त्यातील पहिले सहा महिने प्रदूषणाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी मोजण्याची उपकरणे बसविण्याचे काम पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल. सध्या नळ स्टॉप, कर्वे रस्ता, भोसरी, स्वारगेट आणि चिंचवड येथील हवा प्रदूषण मोजणी नियमितपणे केली जाते. पण, त्यात आणखी चार केंद्रांची भर घालण्यात आली आहे. ही केंद्रे उपनगरांमधील प्रदूषणाची पातळी मोजतील. त्यात हडपसर, बाणेर, कात्रज आणि नगर रस्ता यांचा समावेश केला आहे.

या केंद्रांमध्ये मोजले जाणारे प्रदूषण पुणेकरांना डिस्प्ले बोर्डवर सहजतेने पाहता येणार आहे, हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती ‘एमपीसीबी’च्या पुणे विभागाचे विभागीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी दिली. 

पुढील चार वर्षे प्रदूषण कमी करण्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. २०२२ पर्यंत हा पहिला टप्पा पूर्ण होईल, असेही त्यांनी 
स्पष्ट केले.

दुसऱ्या टप्प्यात काय होणार?
प्रदूषण नियंत्रण हा पहिल्या टप्प्यातील प्रमुख भाग असून, दुसऱ्या टप्प्यात हवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. हा टप्पाही साडेचार वर्षांचा आहे. २०२३ ते २०२७ या दरम्यान त्यात सातत्याने हवेची गुणवत्ता कशी सुधारता येईल, हा याचा उद्देश आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air Pollution Level MPCB Display Board