विमानतळाविरोधातील लढाई जिंकू - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पारगाव मेमाणे - ‘‘गद्दारांचा चोख बंदोबस्त केल्यास पुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित विमानतळाविरोधाची लढाई सहज जिंकू. छत्रपती व संभाजी राजांच्या शौर्याचा वारसा सांगता, मग घाबरता कशाला? रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खांद्याला खांदा लावून लढू,’’ असा निर्धार शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे व्यक्त केला. 

पारगाव मेमाणे - ‘‘गद्दारांचा चोख बंदोबस्त केल्यास पुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित विमानतळाविरोधाची लढाई सहज जिंकू. छत्रपती व संभाजी राजांच्या शौर्याचा वारसा सांगता, मग घाबरता कशाला? रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खांद्याला खांदा लावून लढू,’’ असा निर्धार शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे व्यक्त केला. 

येथील प्रस्तावित विमानतळविरोधी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रव्यापी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा (ता. २७) पारगाव येथे पोचली. त्या वेळी आयोजित सभेत पाटील बोलत होते. याप्रसंगी शेकडो शेतकरी व महिलांनी जेल भरो सत्याग्रहाचे नोंदणी अर्ज भरून दिले.

‘‘दलाली मिळणार नाही म्हणून वन खाते, देवस्थाने किंवा शासकीय जमिनीऐवजी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षड्‌यंत्र विमानतळाबाबत सुरू आहे,’’ असा गौप्यस्फोट शेतकरी सत्यशोधक सभेचे किशोर ढमाले यांनी करून, ग्रामसभेला झुगारून विमानतळवाल्यांना मदत करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचा व गाढवावरून धिंड काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ‘‘खोटे गुन्हे नोंदवून, सत्तेचा गैरवापर करत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा निंदनीय प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत,’’ असा खेद विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय झुरंगे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सुकाणू समितीच्या सुशीला मोराळे, महाराष्ट्र शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, बळिराजा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेशकाका जगताप, संतोष हगवणे, वर्षा मेमाणे यांनी मनोगत व्यक्त केले. गंगाराम जगदाळे, संभाव्य सात बाधित गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या. लक्ष्मण गायकवाड, विठ्ठल मेमाणे, राणीताई झुरंगे, लक्ष्मी धिवार, युवराज मेमाणे, लक्ष्मण बोरावके, रामदास होले संयोजन केले. जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले.

जनतेने स्पष्ट बहुमताची सरकारे दिल्याने हुकूमशहांचा उदय झाल्याचे इतिहास सांगतो. सध्याच्या सरकारमुळे हे लक्षात येते. त्यासाठी जनतेने वेळोवेळी ‘खिचडी’ची (वेगवेगळ्या राजकीय पक्षांची) सरकारे द्यावीत, म्हणजे लोकशाहीची पायमल्ली होत नाही. हक्कांसाठी घटनात्मक मार्गाने भांडता येते.  
 - सुशीलाताई मोराळे, शेतकरी संघटना सुकाणू समिती

Web Title: airport oppose raghunathdada patil