पुण्यातील कोरोनाच्या 'टेस्टिंग इनचार्ज'बाबत अजित पवारांचा मास्टर स्ट्रोक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी करा आणि मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ''कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयांमध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले,  ''पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी 'कम्युनिटी लिडर्स'ची मदत घ्या.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar concerned on pune covid issue appointment new ias officer