अजितदादांची फटकेबाजी अन्‌ हास्याचे फवारे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

बारामती - बाजार समिती संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने रविवारी (ता. 27) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुकीतील विरोधकांना आपल्या खास शैलीत चिमटे काढले. त्यांची फटकेबाजी ऐकताना कार्यकर्त्यांची हसून हसून पुरेवाट झाली. ज्यांच्यापर्यंत जो संदेश द्यायचा होता, तोही त्यांनी भाषणातून पोचविल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

निवडणुकीच्या निमित्ताने काही जण अफवा पसरवत असल्याचा उल्लेख करून त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, की तुम्ही त्यांचा फक्त मोबाईल नंबर मला द्या, मग मी त्यांना माझ्या मवाळ शब्दांत समजावून सांगतो (प्रचंड हशा....). अरे मवाळ हा शब्द चुकला असेल तर माझ्या विनम्र भाषेत विनंती करेन त्यांना (हास्याचा प्रचंड स्फोट...). काही जण म्हणतात, की वर गेल्यावर तुम्ही त्यांना काय सांगणार आहे. मला बाळासाहेबांना वर गेल्यावर काहीही सांगायचे नाही... वर गेल्यावर मी फक्त एकच सांगणार आहे, की मी बारामतीचा सर्वांगीण विकास केला आहे.... (परत हास्याचा स्फोट...)

प्रचाराचा कालावधी वाढविल्याचा उल्लेख करत, हसत हसत पवार म्हणाले, मतदानाच्या आदल्या रात्रीच्या सभेला किती लोक येणार याबद्दलही मला शंकाच वाटते (हास्यकल्लोळ)... अरे तुम्ही हसता काय... कोणत्या उमेदवारांना मत द्यायचं याचा विचार करावा लागतो ना मतदानाच्या आदल्या रात्री.... त्याबद्दल मी बोलत होतो. तुम्ही आपला विनाकारण काहीतरी गैरसमज करून घेता... (परत हास्याचा स्फोट).

काही विरोधकांच्या नावावर कोटी करत त्यांनी कुटुंबाचा विचार न करता वेगळी भूमिका घेतल्याचे नमूद करत, त्यांच्या स्वभावाला कुत्र्याच्या शेपटाची उपमा देऊ केली. काही कार्यकर्ते सत्ता आली की आमच्याबरोबर आणि सत्ता गेल्यावर विरोधकांसोबत याचाही उल्लेख करताना, विरोधातील एका उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी नक्कल करून दाखविली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हास्याचा स्फोट झाला. या निवडणुकीत जे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना पुन्हा कधीही पक्षात सामावून घेतले जाणार नाही, असा इशाराही या वेळी त्यांनी दिला.

Web Title: Ajit Pawar created commedy between speech