अजित पवार म्हणतात अजून बरीच उलथापालथ शक्‍य

मिलिंद संगई
रविवार, 4 ऑगस्ट 2019

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता काहीही घडू शकते. स्वतःच्या ताकदीवर सरकार आणण्याची स्वप्ने काही पक्षांना पडू लागली आहेत. त्यामुळे अजून बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. दुसरीकडे काहीही झाले तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करूनच विधानसभेच्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती शहर : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता काहीही घडू शकते. स्वतःच्या ताकदीवर सरकार आणण्याची स्वप्ने काही पक्षांना पडू लागली आहेत. त्यामुळे अजून बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. दुसरीकडे काहीही झाले तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करूनच विधानसभेच्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामतीमध्ये रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, ""राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. उद्योग व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणूस हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. असे असताना सत्ताधाऱ्यांना मात्र विधानसभेच्या निवडणुकीशिवाय काहीही सुचत नाही.''

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेअर बाजारात जी घसरण झाली त्यामुळे सामान्यांचे सहा लाख कोटी रुपये बुडाले, असा आरोप पवार यांनी केला. दरम्यान, 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर बारामती तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायत त्यांनी विधानसभेची निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी, अशा आशयाचे ठराव करून ते निवडणूक आयोगाला पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या मेळाव्यात भाजपच्या डॉ. अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या "विकासाची वाटचाल' या पुस्तिकेचे प्रकाशनही अजित पवार यांनी केले.

कर रूपाने गोळा केलेल्या जनतेच्या पैशातून वृत्तपत्रे व इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर सरकार स्वतःचा उदो-उदो करून घेत आहे. कोणताही व्यवहार्य विचार न करता निर्णय घेऊन लोकांना खूष करण्याचे काम केले जात आहे. मात्र, यामुळे राज्याचे नुकसानच होणार आहे. सरसकट कर्जमाफी देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना दिला होता. तीन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच नाही.
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticise Government