आता 370च्या नावाखाली मते मागतील : अजित पवार

नितीन बारवकर
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा आणि 370 वे कलम रद्द करण्याचा सुतराम संबंध नाही. राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्‍न वेगळे असताना देखील भाजप-शिवसेनावाले हे कलम रद्द केल्याच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी सामान्य जनतेने जागृत व सावध राहावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

शिरूर (पुणे) : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा आणि 370 वे कलम रद्द करण्याचा सुतराम संबंध नाही. राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्‍न वेगळे असताना देखील भाजप-शिवसेनावाले हे कलम रद्द केल्याच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी सामान्य जनतेने जागृत व सावध राहावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

शिवनेरीहून निघालेली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे शिरूर शहरात स्वागत करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. 370 कलम काढण्याचा निर्णय चांगला असून, त्यास आमचा विरोध असण्याचे कारण नाही. अशा महत्त्वाच्या निर्णयामागे संपूर्ण देश पाठीशी आहे. मात्र, शेतकरी, कामगार, कष्टकरी व सामान्यांचे प्रश्‍न वेगळे आहेत. त्याला बगल देऊन या विषयाच्या आधारे जनतेला भावनिक बनविण्याचा प्रयत्न राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. भाजपवाले त्यात पटाईत आहेत. त्या विषयाचा अधिकार भारत सरकारला होता. निवडून गेलेल्या खासदारांनी ते काम केले. राज्यातील निवडणुकीशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही. पाच वर्षांत जनतेने तुमच्या हाती सत्ता दिली. पण तुम्ही काय दिवे लावले, याचा हिशेब तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश व आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा ही मुख्यमंत्रीपदासाठी आहे; तर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही रयतेच्या कल्याणासाठी. सामान्यांच्या सन्मानासाठी व गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी आहे, असे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले जातात; तर आमच्या यात्रेच्या स्वागतासाठी लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येतात. दोन्ही यात्रांत हा फरक असून, आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कान, डोळे आणि बुद्धी शाबूत असल्याचे दाखवून देईल, असा विश्‍वास कोल्हे व्यक्त केला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीत कुणी थांबत नसल्याचा संदेश देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक भाजप-शिवसेनेत नेतेमंडळींना प्रवेश दिला जात आहे. वास्तविक पाच वर्षांतील अपयश झाकून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे शिरूर-हवेली मतदार संघाचा विकास खुंटला आहे. काही महिन्यांपूर्वी दुष्काळात होरपळणाऱ्या या मतदार संघात आता पुराचे थैमान असून जनता सैरभैर झाली आहे. मात्र, सामान्यांशी काहीही देणेघेणे नसलेले लोकप्रतिनिधी बेपत्ता आहेत. लोकप्रतिनिधी दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे जाहीर करण्याची वेळ आली आहे,
ऍड. अशोक पवार, माजी आमदार, शिरूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticise Government