ओठात राम आणि पोटात नथुराम - अजित पवार

ओठात राम आणि पोटात नथुराम - अजित पवार

पिंपरी - ""भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी चिक्की गैरव्यवहार केला. आता त्यांचे नगरसेवक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तोडपाणी करत आहेत,'' अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली. तसेच शिवसेना-भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असून, त्यांच्या "ओठात राम आणि पोटात नथुराम' असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित जाहीर सभेत पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 2) प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या वेळी मावळत्या महापौर शकुंतला धराडे, विलास लांडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम आदी उपस्थित होते. स्वपक्षातील संभाव्य नाराज उमेदवारांची पवार यांनी समजूत काढली; तसेच भाजपत प्रवेश केलेल्या "राष्ट्रवादी'च्या गद्दारांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

पवार म्हणाले, ""ना भय ना भ्रष्टाचार असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. महिलांना नीट रस्त्यांवरून फिरता येत नाही. कोपर्डीतील नराधमांना फाशी दिली जात नाही. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्ष प्रवेश दिला, तर कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार? भयमुक्त महाराष्ट्र कधी होणार? उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्र्यांना गुंडा-पुंडांचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. शहरात सध्या सर्व भाऊ, दादा आणि भाई एक झाले आहेत. ज्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची पाळेमुळे रुजविली. त्यांच्या मारेकऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकारची माणसे पालिकेत आली तर गुंडांची पालिका होईल.'' 

अजित पवार म्हणाले.... 
- केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांना स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे दाखविले. परंतु, प्रत्यक्षात काम नाही. त्याचा लेखा-जोखा घ्यायला हवा. 
- नोटाबंदीनंतर अंधाधुंद कारभार चालू. महसुलात घट आणि बेरोजगारीत वाढ. 
- टोलमुक्त महाराष्ट्र ही भाजप-सेना सरकारची धूळफेक. टोलला मुदतवाढ देऊन दहा वर्षांत ठेकेदाराला 32 हजार कोटी रुपये देण्याचा प्रयत्न. 
- अनधिकृत बांधकामे 100 दिवसांत नियमित करण्याचे आश्‍वासन; परंतु अडीच वर्षे होऊनही 100 दिवस पूर्ण होई ना! 
- देश किंवा राज्यातील इतर शहरांत पिंपरी-चिंचवड इतका विकास दाखवा. 128 ठिकाणी कोठेही उमेदवार देणार नाही. 
- नगर विकास खाते तुमच्याकडे आहे; मग पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी का झाली नाही? 
- राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगावे, अजित पवारांनी चुकीचे काम करण्यास सांगितले. मी राजकारण सोडून देईन. 
- शिवसेना नेत्यांची औकात दाखवून किंवा कौरव-पांडवांचा नामोल्लेख करून मूलभूत समस्या सुटणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com