शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखले? 

Ajit Pawar
Ajit Pawar

पिंपरी : ''निवडणुका जवळ आल्यावर भाजपला शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात. इतर वेळी त्यांची त्यांना आठवण होत नाही. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखले,'' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. 

चिखलीतील पाटीलनगरमध्ये 20 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे उद्‌घाटन रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सुजाता पालांडे, समीर मासुळकर, धनंजय भालेकर, स्थानिक नगरसेवक दत्ता साने, स्वाती साने उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ''कोर्टबाजी किंवा विरोधाला विरोध करून विकास होत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने विकास केला नाही. ते मेट्रोचे उद्‌घाटन करायला येतील व परत जातील. मात्र, आम्हाला वारंवार तुमच्यात यायचे आहे. राज्यात सर्वाधिक विकास झाला आहे. यामुळे त्यांना टीका करण्यासाठी जागा नाही. म्हणून भ्रष्टाचाराची ओरड केली जाते. आपल्याकडे ई-टेंडरिंग होते. मग भ्रष्टाचाराला वाव कुठे आहे. कारण नसताना खोटे आरोप केले की खरे असलेल्यांना राग येतो. सर्वसाधारण सभेत झालेली घटना यापूर्वी कधीही घडू दिली नाही.'' 

पवार म्हणाले, ''एखादे गाव महापालिकेत गेले की गावाचे गायरान महापालिकेकडे वर्ग केले जाते. या जागेवर सर्वांना अभिमान वाटेल, असे संतपीठ उभारण्याचा आमचा मानस आहे. शहराचा विकास शंभर टक्‍के झाला आहे, असे मी म्हणार नाही. आणखी काही विकास आम्ही आगामी काळात करणार आहोत.'' 

अजित पवार म्हणाले, ''अडीच वर्षांत भाजपने कधी शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते का? शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्यापासून कोणी रोखले होते. दिल्लीची निवडणूक आली की श्रीरामाची आठवण येते. महाराष्ट्राची निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांची आठवण येते. नोटाबंदीचा फायदा अंबानींना होणार आहे. कार्डाचा वापर केला तर लाखो रुपयांचा टॅक्‍स द्यावा लागणार आहे. गेल्या 45 दिवसांत नवनवीन 55 आदेश काढले आहेत.'' 

पवार म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बेंबीच्या देठापासून वेगळा विदर्भासाठी ओरडत होते. त्याच्या प्रचारावर निवडून आले. कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन मतदान करतात आणि मग पश्‍चात्ताप करावा लागतो. बॅंकांना वेगळा आणि पतसंस्थेला वेगळा न्याय का? मोठ्या काळ्या पैशांवाल्यांनी कधीच काळ्याचे पांढरे केले आहे. वैजनाथ बॅंकेचे पैसे सापडले ती बॅंक पंकजा मुंडे यांची आहे. आमची थोडे काही कोणाचे सापडले तरी आमच्यावर आरोप होतात.'' 

अजित पवार म्हणाले, ''सोने खरेदी करताना ऐपत असेल त्यांनी खरेदी केले. मात्र, आता त्यावर बंधने घालत आहेत. महिलांनी साचविलेल्या पैशाबाबतही विचारणा केली जात आहे. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्यांना पकडावे. गोरगरिबाच्या पेशावर डोळा ठेवू नका. कोणताही एखादा श्रीमंत रांगेत उभा राहिलेला पाहिला आहे का? त्यांच्याकडे पैसा कोठून आला. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जाहिरातीवर 18 कोटी खर्च केले.'' 

विलास लांडे म्हणाले, ''आम्ही केलेल्या कामांचे श्रेय काही जण घेत आहेत. दादांनी त्यांना भरभरून दिले. त्याबदल्यात त्यांनी दादांना काय दिले. केवळ निवडून येणे आणि आरोप करणे, हाच काहींचा धंदा आहे. त्यांचे वैयक्‍तिक काम काय आहे. दोन वर्षांत त्यांनी किती निधी शहराच्या विकासासाठी आणला. मी येथील नागरिकांच्या हितासाठी पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी जागा दिली व येथील काही लोकांनी मला पाणी पाजले.'' दत्ता साने व स्वाती साने यांनी प्रास्ताविक केले. 

'ग्रामीण भाग मॉडेल करून दाखवा' 
महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावाचा विकास करण्यासाठी आणखी निधी उपलब्ध करून द्यावा. ग्रामीण भागातील प्रभाग मॉडेल वॉर्ड करून दाखवा, असे आवाहन स्थानिक नगरसेवक दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केले. 

आम्ही केले मग गेले कुठे? 
''मी जुन्नरला जात असताना बैलगाडा शर्यतीबाबत 'आम्ही केले...' असे फलक लावले होते. मग आता ते कुठ गेले, असा टोला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका बैलगाडा शर्यतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com