कर्जमाफी नव्हे...ही तर कर्जवसुली : अजित पवार

गणेश बोरुडे
सोमवार, 4 जून 2018

तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.

तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.

हल्लाबोलच्या आढावा बैठकीसाठी अजितदादा पवार सोमवारी (ता.०४) मावळात आले होते. सकाळी साडेनऊला लेक पॅराडाइजमधील माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी न्याहारीसाठी थांबले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, मध्यंतरी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये आम्हाला अपेक्षित यश न मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यामुळे ते काहीही बरळत सुटले. सत्तारूढ पक्षाला संधी म्हणून पहिली दोन वर्षे आम्ही गप्पच होतो. त्यानंतर सरकारच्या नाकर्तेपणावर आवाज उठवला मात्र त्यांनी आमदारांना निलंबित करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या अटींच्या पूर्ततेसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी आहेत. बोण्ड अळीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. ४७ सालापासून कधीही शेतकऱ्यांचा संप झालेला नाही. वारंवार आंदोलने, संप, इशारे देऊनही शेतकऱ्यांकडे बघायला, चर्चेला वा दखल घ्यायला कुणी तयार नाही. उलट राधा मोहन सिंग यांच्या सारखे कृषी मंत्री शेतकऱ्यांची हेटाळणी करतात. अशांना जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असा टोला अजित पवारांनी सरकारला मारला. चार वर्षांत सरकारने कोणता हिताचा निर्णय घेतला असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

कर्नाटक, उत्तरप्रदेशचे दाखले देत भाजपाला शह देण्यासाठी देशपातळीवर समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्याचे काम चालू असलयाचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणूकपूर्व युतीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्टींकडे असल्याचे सांगत, कुठल्याही मुद्द्यावर शिवसेनेची साथ घेणार नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

माजी मंत्री मदन बाफना, मा.आ.कृष्णराव भेगडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे पीपल्सचे अध्यक्ष बबनराव भेगडे,जि.प.सदस्य बाबूराव वायकर, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, गणेश काकडे, किशोर भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, माया भेगडे, अशोकराव भेगडे, आशिष खांडगे, उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, दत्तात्रेय पडवळ यांच्यासह तळेगाव आणि मावळातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट
राज्याचे कृषिमंत्री वारल्यानंतर त्यांची जबाबदारी कुणाकडे देण्याचे सोडून, त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वीच शासकीय बंगल्याची चावी मागणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट असल्याचे सांगत पवार यांनी या घटनेचा धिक्कार केला.

संपामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत
सुदैवाने यावेळी मॉन्सूनचे आगमनही वेळेवर झाले असले तरी सध्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधी संप चालू असल्याने शेती मशागत आणि पेरणीची वेळ टळून गेल्यास आणखी मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागण्याची भीती असल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. त्यामुळे मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करायला हवे असेही पवार म्हणाले.

सरकार पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगवायला निघाले
आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेणारे सरकार साखर आयातीनंतर आता तूर देखील आयात करणार आहे. सरकार पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगवायला निघाले असल्याचा घणाघाती आरोप अजितदादा पवार यांनी केला.

Web Title: ajit pawar criticizes BJp over farmers loan relief