ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे बोलायचेच कमी झाले...

संतोष शेंडकर
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

ईडीच्या चौकशीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवून ठेवलं. काय झालं काय माहित ते बोलायचेच कमी झाले. ही थट्टामस्करी नाही वस्तुस्थिती आहे. लोकशाहीत इतकं जुलमी वागून चालत नाही. यांना सत्तेचा माज आला आहे, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

सोमेश्वरनगर (पुणे) : आज वेगवेगळ्या लोकांना आमिषं दाखवून आपलसं केलं जात आहे. काहींना भिती दाखवत आहेत तर काहींच्या चौकशा लावत आहेत. लोकसभेला राज ठाकरे किती बोलायचे पण त्यांना ईडीच्या चौकशीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवून ठेवलं. काय झालं काय माहित ते बोलायचेच कमी झाले. ही थट्टामस्करी नाही वस्तुस्थिती आहे. लोकशाहीत इतकं जुलमी वागून चालत नाही. यांना सत्तेचा माज आला आहे, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या सोमेश्वर शिक्षण मंडळाच्या विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. 

पवार म्हणाले, लोकशाहीत इतकं एकतर्फी वागून चालत नाहीत. सरकार काय येत असतात जात असतात. पण ह्यांना सत्तेची नशा चढली आहे. पण आज अमुक जाणार, तमुक जाणार हेच रोज वाचायला मिळतेय. ते भिती दाखवत आहेत. राज ठाकरेंची त्यांनी ईडीकडून चौकशी केली. कुणालाही नोटीसा काढत आहेत. निवडणुकीसाठी आम्ही एवढी रक्कम देऊ, सगळा खर्च करू अशी आमिषं दाखवत आहेत. नियमाप्रमाणे पण खर्च करतो आणि वरचाही खर्च करतो असे सांगत आहेत. जाणारे आमदार म्हणतात, करणार काय दादा सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. काहींना तीन पिढ्या पक्षाने भरभरून दिलं तरी ते जात आहेत. उद्या दिवस बदलल्यावर तिथूनही ते उड्या मारतील. पक्ष बदलणं म्हणजे आई बदलण्यासारखं आहे. पण आता जे गेले त्यांना लखलाभ. त्यांचाही तिथं भ्रमनिरासच होईल. राष्ट्रवादीत उलट आता नव्या, तरूण चेहऱ्यांना संधी मिळेल. आणि नेते गेले तरी कार्यकर्ता पक्षाबरोबर आहे. छत्तीसग, राजस्थान, मध्यप्रदेशाप्रमाणे इथेही भाजपाचा पराभव होईल.  

राज्यावर पाच लाख कोटींचं कर्ज झालं आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी हे प्रत्येकजण यात्रा करण्यात मशगुल झाले आहेत. 52 टक्के उद्योग अडचणीत आहेत. आर्थिक 

मंदीचं संकट आहे आणि हे राष्ट्रवादाचा, कलम 370 चा मुद्दा पुढे घेतात. मुलामुलींना हे बरं वाटतं. पण लाखो कामगारांचे रोजगार गेले. सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीडीपी घसरला असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या नाहीत. ग्रामेसव, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संपावर आहेत. शिवराय आणि बाबासाहेब यांच्या स्मारकाची ह्यांना वीटही लावता आली नाही आणि उध्दव ठाकरे मोदींच्या सभेत राममंदिर बांधा म्हणतात. बांधा की तुम्हाला कुणी अडवलंय?, अशी खिल्ली पवार यांनी उडविली. तसेच नवे खासदार, नवे आमदार झाले की त्यांना काय करू काय नको असं होऊन जातं. थोडे दिवस झाल्यावर त्यांना कळतं की असं एककल्ली वागून चालत नाही.

डावा कालवा व उजवा कालवा या सगळ्यांनाच पाणी मिळालं पाहिजे, अशी खासदार रणजितसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच बारामती 2024 च्या निवडणुकीत जिंकायची स्वप्न हे पाहतात. म्हणजे 2019 सोपं नाही हे तर मान्य केलं. आज ग्रामपंचायतीपासून लक्ष घालणार आहेत. मंत्री संत्री बारामतीत घडी विस्कटायला येत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar criticizes Raj Thackeray on ED inquiry