
Chinchwad By Election : "ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न" ; कलाटेंच्या बंडखोरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
Chinchwad Bypoll Election : पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी शिवसेनेचे राहुल कलाटे हे निवडणूक लढवतील अशा चर्चा आज सकाळपर्यंत सुरू होत्या. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांचं नाव जाहीर केलं.
नाना काटे यांनी अर्ज देखील भरला आहे. तर राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, "१० उमेदवार इच्छुक होते, त्या सर्वांशी मी बोलले. राहुल कलाटे यांच्याशी देखील मी चर्चा केली. त्यानंतर अंतिम निर्णय झाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांचे नाव घोषित करण्यात आले. राहुल कलाटे यांना आम्ही सांगण्याचे काम करु, ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे."
महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. वाकड येथून मोठी पदयात्रा काढत कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.