राज्याची घडी विस्कटून टाकली - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 April 2018

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार व तीन आमदार असले; तरी मंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, राहुल कुल व सुरेश गोरे हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्याकडूनच तिकडे गेलेले आहेत; परंतु त्यांना जिल्ह्यासाठी काहीही करता आले नाही.
 - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री  

शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून टाकली आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाची पुणे जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा आज येथील पाबळ फाटा मैदानावर झाली. या सभेत अजित पवार बोलत होते. ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील व अनिल देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, आमदार राहुल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील अनेक भागात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत, पुणे-शिरूर रस्त्यावरील वाहतूक नियोजन कोलमडले आहे, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, दिवसाढवळ्या खून पडत आहेत, महिला व मुलींची सुरक्षा धोक्‍यात आली आहे, सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कामगार व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे, ‘जीएसटी’मुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे; अंगणवाडी सेविका, एसटीचे कर्मचारी, माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे, पोलिस भरती थांबली आहे, शेतीमालाला बाजारभाव नाही, कर्जमाफीचा भुलभुलैया जनतेच्या लक्षात आला आला आहे. स्पर्धा परीक्षेचा बोजवारा उडाला आहे, बेरोजगारी, आरोग्याची समस्या वाढत आहे. विजेची समस्या कायम आहे. वाळूचे लिलाव बंद केले; पण बांधकामे कशी करायची, हे स्पष्टपणे सांगितले जात नाही.’’

माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार पोपटराव गावडे, विकास लवांडे यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी आभार मानले.

‘भाजप, शिवसेनेला भुलू नका’
‘‘वाफसा उडून गेल्यावर पेरणी करायची, असला धंदा राज्यकर्त्यांचा चालू आहे. भाजप, शिवसेना एकाच माळेचे मनी असून, छुप्या युतीतून जनतेला वेड्यात काढण्याचा त्यांचा भुलभुलैया चालू आहे. फसवणूक व लुबाडणूक करणारे पुन्हा येतील, पण त्यांना आता भुलू नका,’’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar speech in hallabol rally