‘हे तर मनुवादी सरकार’ - अजित पवार

‘हे तर मनुवादी सरकार’ - अजित पवार

पिंपरी - आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आरएसएसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार मनुवादी असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २१) येथे केली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने थेरगाव येथे आयोजित विद्यार्थी मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजालाही सर्व क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी पाच टक्‍के आरक्षण दिले. त्यांना एकही मुस्लिम बांधव मंत्रिपदासाठी लायक व्यक्‍ती दिसली नाही? मनुवादी सरकारने रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर त्याची जात खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. कन्हैयालाल, हार्दिक पटेल यांना त्रास देण्याचे काम आजही सुरू आहे. युवाशक्‍ती देशाची ताकद आहे.

पुणे विद्येचे माहेरघर आहे. यापूर्वी विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी जात असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. आज नामांकित शिक्षण संस्था शहरात आल्या आहेत. त्यांना आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी संघटनेचे काम संघर्षमय असते. जरी सत्तेत असलो तरी चुकीचे असल्यास आंदोलन केले पाहिजे. शाहू महाराजांची शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. वसंतदादा पाटील यांचे शिक्षण कमी असून सर्वांनी शिकले पाहिजे, यासाठी ते प्रयत्नशील होते.’’

सुनील गव्हाणे म्हणाले, ‘‘शहरातील जे विरोधक स्वतःला राम-लक्ष्मण म्हणवून घेत आहेत, ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ज्यांनी त्यांना मोठे केले त्या नेत्यांना ते विसरले.’’

अजित पवार म्हणाले
आई-वडिलांच्या पाया पडा, नेत्यांच्या नको
आरक्षणाला विरोध करणाऱ्या आरएसएसचा जाहीर निषेध
केंद्रातील सरकार आल्यापासूनच असहिष्णुतेचा मुद्दा पुढे आला
हिटलर आणि सद्दाम हुसेनप्रमाणे ‘ते’ कधीही यशस्वी होणार नाहीत
पवार साहेबांमुळे ‘आयटी हब’ आणि बालेवाडी क्रीडा संकुल झाले
मेक इन इंडियामुळे गुंतवणूक नाहीच; पण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या
सोशल मीडियावरील राष्ट्रवादीच्या बदनामीला उत्तर द्या
सरकारकडून भगवीकरणाचा प्रयत्न, सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री का नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com