अजित पवार, सुनील तटकरे लवकरच गजाआड - सोमय्या

अजित पवार, सुनील तटकरे लवकरच गजाआड - सोमय्या

पिंपरी - 'सिंचन गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे, मला त्यात ढवळा-ढवळ करता येणार नाही. परंतु, दोघांवरही फौजदारी कारवाई होऊन त्यांना अटक होईल,'' असा खळबळजनक दावा खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

पिंपरीतील भ्रष्टाचारविषयक व्याख्यानानिमित्त सोमय्या हे आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी वरील दावा केला. खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले, 'सिंचन गैरव्यवहारातील 80 टक्के प्रकरणे मार्गी लागली आहेत. मुख्य कंत्राटदार गजाआड झाला आहे. लवकरच पुढील तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होतील. आरोपपत्रांत अजित पवार आणि सुनील तटकरे यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्धही फौजदारी कारवाई होईल. तसेच तेदेखील गजाआड होतील.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचारमुक्त भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हवा आहे, असे नमूद करून सोमय्या म्हणाले, 'त्याचप्रमाणे आम्हाला मुंबई माफिया मुक्त हवी आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, भ्रष्टाचार संपविणे आणि मुख्यमंत्री यांच्या विकास व्हिजन' हे आमचे तीन मुद्यांवर आधारित अभियान आहे. प्रत्येक पक्षात सगळेच वाईट नसतात. आमच्या मित्रपक्षातील केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राज्यातील काही मंत्री चांगले काम करत आहेत. माझी लढाई माफियांविरोधात आहे. परंतु, मुंबई महापालिकेतील माफियाविरोधात आवाज उठविल्यावरही माफियाराज चालत असेल तर त्यांनी कारवाई का केली नाही ?'' असा सवालही त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून केला. तसेच आम्ही मोठ्या मनाचे आहोत. माफिया मुक्त मुंबई, पालिकेतील प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करणे आणि विकासाचे व्हिजन यासाठी ज्यांचे सहकार्य आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळेल त्याचे स्वागत केले जाईल.''

पारदर्शक कारभाराबद्दल उल्लेख करून सोमय्या म्हणाले, 'मुंबईत आम्ही मित्रपक्षासोबत अनेक वर्षे सत्तेत होतो. परंतु, आमच्याकडे अधिकार नव्हते. भ्रष्टाचार लक्षात आल्यावर तो थांबविला गेला पाहिजे.''

जनतेनेच उत्तर दिले...
शिवसेनेचा नामोल्लेख टाळून सोमय्या म्हणाले, 'राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर झाल्या. त्यामध्ये मित्रपक्षाने मोदी आणि राज्य सरकाराविरोधात मुद्दे मांडले. परंतु, तरीही आमचे 72 नगराध्यक्ष निवडून आले. आणि 26 नगराध्यक्ष मित्रपक्षाचे झाले. युतीमधील दोन्ही पक्षांचे पक्ष-सिद्धांत, नीती-नियम एकसारखे नाहीत. परंतु, किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करता येते. नगरपालिकेच्या निवडणुकांमधून जनतेनेच निकालामधून उत्तर दिले आहे.''

औद्योगिक दरात 5.4 टक्‍क्‍यांनी वाढ !
नोटाबंदीमुळे पिंपरी-चिंचवडमधून उद्योग आणि कामगार-मजुरांचे स्थलांतर झाल्याच्या आरोपाचा समाचार घेताना सोमय्या म्हणाले, ""आयआयटीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2016 मध्ये औद्योगिक विकासाचा दर 5.4 टक्‍क्‍यांनी वाढला. नोटाबंदीला कॉंग्रेसने विरोध केला. परंतु, शरद पवार कधी इकडे तर कधी तिकडे असतात. त्यामुळे, त्यांची नेमकी भूमिका समजत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com