'व्यंकय्या नायडू' हे काय नाव आहे?

ajit pawar
ajit pawar
  • मुळा - मुठाच्या मुद्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर
  • नोटाबंदीचा फटका आम्हालाही बसतोय!

पुणे: म्हणे 'व्यंकया नायडू', हे असले कसले नाव आहे; आम्हाला आवडले नाही म्हणून तुम्ही बदलणार का, अशी टपली मारताना "पण तरीही आम्ही ते बदला अशी मागणी करणार नाही', असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीवेळी लगावला.

मुळा आणि मुठा या नद्यांची नावे बदलण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री नायडू यांनी आम्हाला येथे येऊन शिकवू नये, त्यांना जे काय बदलायचे आहे ते त्यांनी तिकडे बदलावे, असेही पवार यांनी सुनावले.

अजित पवार यांनी दीड तासाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे सहयोगी सदस्य आणि राज्यसभा खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट यांचाही समाचार घेतला.

'नायडू हे केंद्रातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा आदर आहे. म्हणून त्यांनी आमच्या संस्कृतीचे शेकडो वर्षांपासून प्रतीक असलेल्या नद्यांची नावे बदलण्याचा सल्ला द्यावा. मुळा, मुळा ही काय नावे आहेत, बॉम्बेचे नाव मुंबई केल्याप्रमाणे हीदेखील बदलावीत असे येथे येऊन सुचवणे पुणेकरांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावणारे आहे. आम्हाला वाटले होते चुकून बोलले असतील, नंतर करतील खुलासा. पण तसे काही घडले नाही. त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यायला हवे होते. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवूनही ते आजपर्यंत काही बोलले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस नायडू यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करते. येथील जनता असले प्रकार खपवून घेणार नाही, त्यांना धडा शिकवेल,' असे पवार म्हणाले.

खासदार काकडे यांच्यावर टिप्पणी करताना त्यांचा नामोल्लेख टाळून पवार म्हणाले, 'अनुभव नाही, शिक्षण नाही, प्रश्‍नांची जाण नाही, व्हीजन नाही असा दलाली करणारा माणूस भाजपचा नेता झाला आहे आणि गुंडांना पक्षात घेऊन तिकिटे देत आहे. डिझायनरने दिलेला पोशाख घालून, जॅकेट घालून कुणी नेता होतो का? हे मात्र आता येऊन एवढ्या जुन्या पक्षांची सूत्रे हलवू लागले आहेत. बरं, त्यांचे पालकमंत्री वा अन्य कोणाशीही पटत नाही. हे पक्ष काय सुधारणार!'

या 'के'चीही तीच अवस्था होणार
माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या रोखाने बोलताना 'यापूर्वीही एका 'के'ने आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध भरपूर राजकारण करण्यात आले. मात्र त्या 'के'ची सध्या काय स्थिती आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आता हा 'के' (काकडे) आला आहे. या "के'चेही तेच होणार बघाच तुम्ही!'

नोटाबंदीचा आम्हालाही फटका
केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांना फटका बसला आहे. मात्र याला भाजप अपवाद ठरला आहे. त्यांचकडे कसा काय पैसा येतो? सत्तेवर असण्याचा फायदा त्यांनी घेतला असावा. पण हे मात्र खरे की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एखाद्याला शब्द टाकला की तो लगेच मदत करायचा. आता तेच लोक नोटाबंदीचे कारण सांगतात. नोटाबंदीमुळे खूप अडचणी येत आहेत.

पुणे सुधारणार की गुंडांना?
"आम्ही गुंडांना निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारू, असे भाजपची मंडळी (रावसाहेब दानवे) जाहीरपणे बोलत आहेत, मग, शहर सुधारणार की, तुमच्या पक्षातल्या गुंडांना', असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. जी स्वप्ने दाखवत भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली, ती पूर्ण झाली का, हा प्रश्‍न आहे. केंद्रातील मोदी सरकारची अडीच वर्षांची आणि राज्यात फडणवीस सरकारचा दोन वर्षांची कामगिरी जनतेचा अपेक्षाभंग करणारी ठरली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हे केवळ थापा मारत आहेत, त्यामुळे राज्यात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि सामान्य माणूस कोणीही समाधानी नाही. दोनच वर्षांत भाजपला सत्तेचा मस्ती आली आहे. राज्याचा शिक्षणमंत्री सोलापुरातील एका विद्यार्थ्याला धमकी देतोच कसा. भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांनी एकमेकांवर जे कमरेखालचे वार सुरू केले आहेत ते महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत. या राज्यात असे पूर्वी कधीही घडले नव्हते. भाजप खुलेआमपणे पक्षात गुंडांना प्रवेश देत आहे आणि वरून आम्ही गुंडांना पक्षात घेतल्याचे निर्लज्जपणे मान्यही करत आहे. त्यावर कडी म्हणजे आम्ही गुंडांना निवडून आणू आणि पुन्हा त्यांना सुधारू, असे विधान भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने नुकतेच केले. भाजप नेते शहर सुधारणार आहेत की गुंडांना? असा सवाल करून "पुणे आणि पिंपरी - चिंचवडची जनता सुज्ञ आहे; कोणाला निवडून द्यायचे हे त्यांना चांगले समजते', असे पवार म्हणाले.

समविचारी पक्षांसोबतच
महापालिका निवडणुकीत आपण यापूर्वी काँग्रेसशी आघाडी केली नव्हती, यावेळीच का आघाडी केली; निवडणुकीनंतर नवी समीकरणे जमतील काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले, की समविचारी, धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेण्याची आमची भूमिका राहिली आहे. यापूर्वीही त्यासाठी प्रयत्न केले होते, यावेळी आघाडी होऊ शकली. निवडणुकीनंतरही आमची आघाडी कायम राहील. पूर्वीच्या निवडणुकीमध्ये पुण्यात आम्ही तत्कालीन काँग्रेस नेत्यांसमोर निकालानंतर प्रस्ताव ठेवला होता; परंतु त्यांना तो मान्य झाला नाही. पुन्हा जनतेवर निवडणूक लादणे योग्य नसल्याने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मात्र अडीच वर्षांनंतर काँग्रेसला जाणीव झाली आणि ते पुन्हा आमच्यासोबत आले, असे पवार यांनी सांगितले.

'पीएमपी'बाबत एक चूक झाली
पीएमटी आणि पीसीएमटी या दोन मनपा सार्वजनिक बससेवांचे एकत्रिकरण करून अजितदादांनी वाट लावली या पालकमंत्री बापट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'आम्ही त्यावेळी सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकून दोन्ही सेवा एकत्र करून पीएमपीएमएल म्हणजे पुणे परिवहन महामंडळ लि. कंपनी स्थापन केली. आता तुम्ही मंत्री आहात, तुमच्या हातात सत्ता आहे, उगीच टीका करत बसण्यापेक्षा तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. आमचा निर्णय बरोबरच होता. मात्र एक चूक झाली. ती म्हणजे पीएमपीएमएलसाठी आम्ही चांगला अधिकारी देऊ शकलो नाही. मध्यंतरी श्रीकर परदेशी यांच्या काळात चांगली सुधारणा झाली होती. त्यांच्यासारखा अधिकारी अधिक काळ मिळाला असता तर पुण्याची सार्वजनिक बससेवा नक्कीच वेगळी दिसली असती,' अशी कबुली अजित पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com