पौराणिक संदर्भ असणारा आजोबागड

डॉ. एम. एम. ढवळे, राजगुरुनगर
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

आजोबागड किंवा अजपर्वत किंवा आजोबाचा डोंगर हा सह्याद्रीच्या बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्‍चंद्रगडाच्या मध्यभागी 4500 फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा गड आहे. याच ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी तपश्‍चर्या केल्याचा व वनवासात असताना काही काळ सीतेचे वास्तव्य व लवकुशांचा जन्म झाल्याची आख्यायिका प्रचलित आहे.

पुणे व्हेंचरर्सचा शनिवार-रविवारी आजोबा ट्रेक ठरला आहे. मी तुम्हा उभयतांसाठी टीमलीडर स्नेहलला सांगून ठेवले आहे, असा एका पत्रकार मित्राचा फोन आला. गेले वर्षभर आई बिछान्याला खिळून असल्यामुळे दर रविवारी कुठल्या तरी गडकिल्ल्यावर भटकंती करणारे आम्ही दोघेही वर्षभर या आगळ्यावेगळ्या घरदारांच्या सगळ्यांच्याच रोषास कारणीभूत ठरलेल्या छंदापासून काहीसे दुरावलो होतो. काही ना काही कारणामुळे आजोबागड करायचे राहिले होते. दोघांनाच इतका दूरचा व थोडासा अवघड ट्रेक करण्याची संधी पुन्हा मिळण्याची शक्‍यताही दुर्मिळ होती. त्यामुळे टीमलीडर स्नेहल अंगोळकर हिला होकार कळवून टाकला. तिने आमची वयं विचारल्यावर मध्यस्थांकडे थोडी नाखुषी व्यक्त केली. मित्राने आमच्यामुळे काहीही त्रास वा अडचण होणार नाही, अशी हमी दिल्यावर आमच्या सहभागाची खात्री झाली.

नारायणगाव-जुन्नर-माळशेज घाट उतरून मोरोशीच्या थोडे पुढे जाऊन उजव्या फाट्यावर वळून डोळखांबमधून सव्वातीन वाजता डेहणे या पायथ्याच्या गावात 180 किलोमीटर अंतर कापून पोचलो. संपूर्ण प्रवासात जाणीवपूर्वक मागे बसलेल्या तरुणाईने गाण्यांच्या भेंड्या खेळत गोंगाटात झोपू न शकणाऱ्यांची झोपमोड केली. तेथे पोचल्यावर पहाटेच्या थंडीत ज्याला जेथे आणि जसे शक्‍य आहे तेथे झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पहाटे लवकरच उठून उत्साही कार्यकर्त्यांनी सर्वांसाठी मस्त चहा तयार केला. जवळच एक स्वच्छ पाण्याचा हातपंप होता, त्यामुळे पाण्याची व्यवस्था पटकन झाली.

कसेबसे आवरून व गरमागरम चहा पोटात ढकलून ट्रेकची सुरवात झाली. 15 ते 65 वयोगट असणाऱ्या आमच्या 48 जणांपैकी कोणाचाही हा ट्रेक झालेला नसल्याने पाटेकर नावाच्या एका मध्यमवयीन गृहस्थाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतले. बऱ्याचशा उत्साही तरुण मंडळींबरोबर इतरही सगळे तयारीचे असल्याचे पहिल्या 5-10 मिनिटांतच लक्षात आले.
आम्ही सगळे एक तासातच पहिला टप्पा म्हणजे वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात पोचलो. आश्रमाचा परिसर घनदाट व बऱ्याच जुन्या वृक्षांनी व्यापलेला आहे. आश्रमाची प्राचीनता लक्षात येण्याइतपत जपलेली आढळली. मोठ्या वृक्षांना दगडी पार बांधलेले आहेत. जमीन शेणाने सारविलेली होती. मुख्य मंदिरही साध्या बांधणीचे आहे. मंदिरासमोर शौर्याची प्रतीके असणाऱ्या अनेक विरगळ व्यवस्थित मांडल्या होत्या. नव्यानेच समोरच्या मोकळ्या जागेत भक्त/पर्यटकांसाठी एक मोठा हॉल राहण्यासाठी म्हणून बांधलेला दिसला.

समाधीचे दर्शन घेऊन सर्व जण डाव्या बाजूला थोडेसे खाली उतरून एका बारमाही वाहणाऱ्या झऱ्याच्या ठिकाणी जमलो. सकाळी घेतलेला चहा पोटातून केव्हाच नाहीसा झाला होता. नाश्‍त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण करून मनसोक्त खाणे झाले. येथून पुढची वाट जास्त चढणीची व तितकीच घसरडी आहे. बहुतेक सगळी वाट ही पावसाचे पाणी वाहून नेत असणाऱ्या धबधब्याच्या मार्गानेच आहे. अख्खी उभी चढण असल्यामुळे सकाळची वेळ, हवेत गारवा व सावलीच असूनही दम लागत होता व घामही त्रास देत होता. तासाभरात आम्ही एका खिंडीत पोचलो. येथे वाट संपली होती व त्याचबरोबर अर्धा ट्रेकही संपला होता. येथे समोर दरीच्या दोनही बाजूंना अक्राळविक्राळ कातळकडे दिसतात. वर जाणे पट्टीच्या प्रस्तरारोहण येणाऱ्यांनाच शक्‍य आहे. वर टॉप करायचाच असेल तर भंडारदरा धरणाच्या बाजूने शिरपुंज्याचा भैरवगडाजवळ असणाऱ्या कुमशेत गावातून एक वाट आहे. दरीच्या डाव्या बाजूला एक पाण्याने भरलेले टाके आढळले. परंतु पाणी पिण्यायोग्य नव्हते. तेथून पलीकडे रतनगड त्याच्या नेढ्यासकट लक्ष वेधून घेत होता. त्याच्याही पलीकडे सांधणदरीचा परिसर व अलंग, मदन व कुलंग हे गड भटक्‍यांच्या काळजाचे तुकडे खुणावत होते.

उजव्या बाजूच्या कातळकड्यात एक गुहा लक्ष वेधून घेत होती. तिथे जाण्यासाठी एक अपुऱ्या उंचीची शिडी त्या कड्याला टेकविलेली होती. वर जाणे थोडे अवघडच वाटले. वर गुहेमध्ये एक पाळणा होता, त्याला सीतेचा पाळणा म्हणतात, असे सांगितले गेले. तेथेच डाव्या बाजूला एक आयताकृती पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. गुहाही ओबडधोबड असून फारशी मोठी नाही. 25/30 लोक कसेबसे बसू शकतात. सर्वांना गुहेत येऊन जाणे शक्‍य व्हावे व वेळेची बचत व्हावी म्हणून वर एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला गेला.
पोटाची अवस्था सकाळी काही खाल्ले की नाही अशी झाल्याचे जाणवू लागले होते. ऊनही वाढायला लागले होते. येताना सूर्यनारायणाचे दर्शन झाले नव्हते, परंतु घाई केली नाही तर उन्हाचा त्रास होणारच होता. पाणी पिऊन परतीच्या वाटेला लागलो. सह्याद्रीत मुबलकतेने आढळणारी कारवी भक्कम व तत्परतेने आधार देऊन घसरण टाळीत होती. तासाभरात पुन्हा एकदा आश्रमाच्या रम्य, शांत, शीतल व पवित्र परिसरात दाखल झालो. झऱ्याच्या स्वच्छ व थंडगार पाण्याने ताजेतवाने होऊन पुढची वाटचाल सुरू झाली. परतताना ही वेगळी वाट पत्करली होती. या वाटेवर एका मोठ्या पाषाणावर सीतेच्या उजव्या हाताच्या तळव्याचा मनगटासहित ठसा असल्याचे गाईडकडून समजले. तिथून पुढची वाट घसरडी पण जवळची होती.

साधारण दुपारी एक वाजता आम्ही सर्व जण गावात पोचलो. अगोदरच सांगून ठेवले असल्यामुळे लगेच फ्रेश होऊन पाटेकरांच्या घरात व पडवीत स्वच्छ शेणाने सारविलेल्या जागेत मस्त मांडी घालून जेवलो. आता सर्वांना घरी परतण्याचे वेध लागले होते. पुन्हा एकदा पाठीमागे नजर वळवून त्या भल्याथोरल्या आजोबाचे रूपडे डोळ्यांत साठवून घेतले.
परतीच्या प्रवासात अतिउत्तम ठिकाणाचा वेळेत व निर्विघ्न ट्रेक झाल्याची चर्चा रंगली. माळशेज घाट संपल्यावर चहापानासाठी एक छोटासा ब्रेक घेऊन वाहतुकीच्या गर्दीतून वाट काढीत आम्ही सायंकाळी सात वाजता खेडला पोचलो. अभ्यासपूर्ण आखणी, वेळेचे योग्य नियोजन, तरुणांचा सळसळता उत्साह, जुन्यांचे मार्गदर्शन या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी वेळेत, कमी श्रमात व कमी पैशात चांगल्या ग्रुपबरोबर एक उत्तम ट्रेक करायला मिळाल्याचे समाधान होय.
आजोबागडाच्या गुहेत पुणे व्हेंचरर्सचे ट्रेकर्स.
(शब्दांकन : सदाशिव आमराळे, दावडी)

Web Title: ajobagad trek experience blog